गोवा : मुरगाव पालिकेचे प्रतिदिन २० कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे ध्येय

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

वास्को, १३ मे (वार्ता.) – येथील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बिजीकरण मोहीम प्रखरपणे राबवण्याचा निर्णय मुरगाव नगरपालिका मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पालिका मंडळाने प्रतिदिन २० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे ‘पिपल फॉर ॲनिमल’ संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले आहे. भटक्या कुत्र्यांच्या सूत्रावरून मुरगाव पालिकेने या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आमदार दाजी साळकर यांच्यासह उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, मुख्याधिकारी जयंत तारी, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक, ‘गोवा कॅन’चे समन्वयक रोलंड मार्टिन्स, ‘पिपल फॉर ॲनिमल’ संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

बैठकीत वाहनचालकांची कमतरता असेल, तर योग्यरित्या ते सरकारकडे मांडण्याची आवश्यकता असल्याचे रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले. बैठकीत मुरगाव पालिकेने केलेल्या पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीचा अहवाल समोर ठेवण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

‘कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे योग्य आहे; मात्र सध्या भटकी कुत्री नागरिकांचे चावे घेत आहेत. त्यावर उपाययोजना काय आहे ?’, असा प्रश्न नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी उपस्थित केला. या कुत्र्यांना एकाच जागी खाद्यपदार्थ द्यावेत, अशी मागणी नगरसेवक फ्रेड्रिक हेन्निक्स यांनी केली.