भूमाफियांच्‍या आर्थिक लाभासाठीच ‘गोरक्षण संस्‍थे’च्‍या भूमीवरून समितीला हटवण्‍याचे कार्य चालू ! – सुनील पावसकर, गोरक्षण बचाव समिती, अध्‍यक्ष

कराड येथे ‘गोरक्षण बचाव समिती’चे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण !

उपोषणास उपस्‍थित गोप्रेमी

कराड, ९ मे (वार्ता.) – येथील मध्‍यवर्ती भागात असलेल्‍या ‘गोरक्षण संस्‍थे’च्‍या जागेवर विकास आराखड्याच्‍या नावाखाली आरक्षण टाकून व्‍यापारी संकुलनाचा घाट घातला जात आहे. कराड नगर परिषद तांत्रिक कारणे देऊन आरक्षणाची सद्यस्‍थितीची माहिती देण्‍यास टाळाटाळ करत आलेली आहे. यामुळे नगर परिषदेच्‍या हेतूविषयी शंका निर्माण झाली असून हा सर्व प्रकार भूमाफियांच्‍या आर्थिक लाभासाठीच केला जात आहे, अशी घणाघाती टीका ‘गोरक्षण बचाव समिती’चे अध्‍यक्ष श्री. सुनील पावसकर यांनी केली. ते गोरक्षण समितीच्‍या वतीने येथील तहसीलदार कार्यालय समोर करण्‍यात आलेल्‍या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्‍या वेळी बोलत होते.

निवेदन स्‍वीकारतांना कराडचे तहसीलदार विजय पवार (गुलाबी सदरा)

यानंतर उपोषणस्‍थळी कराडचे तहसीलदार विकास पवार यांनी भेट देऊन ‘गोरक्षण बचाव समिती’चे म्‍हणणे ऐकून वस्‍तूस्‍थिती जाणून घेत याविषयी सहकार्य करण्‍याचे आश्‍वासन दिले. या वेळी समितीच्‍या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्‍यात आले. या निवेदनात गोरक्षण केंद्राची जागा काही भूमाफियांनी गोरक्षण संस्‍थेचे परस्‍पर मूळ मालक सप्रे आणि कुटुंबीय यांच्‍याकडून नगर परिषदेच्‍या आरक्षणाचा लाभ घेऊन अवैधरित्‍या अत्‍यंत नाममात्र रकमेला विकत घेतली आहे. याविरुद्ध आम्‍ही कराड न्‍यायालयात दाद मागितली आहे. तसा खटला न्‍यायालयात प्रविष्‍ट आहे. ‘गोरक्षण केंद्रात गोप्रेमींच्‍या साहाय्‍याने गोधनाचा उत्तम प्रकारे सांभाळ केला जात असून सदरची जागा गोरक्षण संस्‍था ट्रस्‍ट यांच्‍या वहिवाटेत असेपर्यंत कोणतीही अनुचित कार्यवाही करू नये’, अशी मागणी करण्‍यात आली आहे.

उपोषणकर्त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेतांना कराडचे तहसीलदार विजय पवार (गुलाबी सदरा हातामध्‍ये निवेदन घेतलेले) 

या उपोषणास पाटण येथील प.पू. धारेश्‍वर महाराज यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच कराड तालुक्‍यातील विविध राजकीय, सामाजिक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्‍यवर, गोप्रेमी आणि महिला या वेळी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होत्‍या. (गोप्रेमींच्‍या महाराष्‍ट्रात अशा प्रकारे आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)

गोरक्षण समितीच्‍या वतीने करण्‍यात आलेल्‍या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास कराड तालुक्‍यातील विविध राजकीय, सामाजिक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी प्रत्‍यक्ष सहभागी होऊन  पाठिंबा दर्शवला. यामध्‍ये कृष्‍णा कारखान्‍याचे संचालक श्री. धोंडीराम जाधव, शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्‍हाप्रमुख अक्षय मोहिते, महिला उपजिल्‍हाप्रमुख सौ. सुलोचना पवार, तालुकाप्रमुख सौ. विद्या शिंदे, श्री. प्रमोद वेर्णेकर, मनसेचे जिल्‍हा सचिव श्री. चंद्रकांत पवार, श्री. दादासौ शिंगण, भाजपचे श्री. विष्‍णू पाटसकर, ‘महावीर गोशाळे’चे श्री. संजीव शहा, जैन समाजाचे अध्‍यक्ष श्री. कांतीलाल भंडारी, लिंगायत समाजाचे श्री. गुरुनाथ कचरे, दैवज्ञ समाजाचे माजी अध्‍यक्ष श्री. प्रसाद पावसकर, दिव्‍यांग समुदृष्‍टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडलचे श्री. राजेश चांडक, गोरक्षण केंद्राच्‍या व्‍यवस्‍थापिका सौ. मंगल सुर्यवंशी (यादव), श्री. प्रशांत तवर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. सागर आमले, श्री. अनिल खुंटाळे, शिवतेज सामाजिक संघटनेचे अध्‍यक्ष श्री. गणेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल कडणे, सनातन संस्‍थेचे श्री. चिंतामणी पारखे, श्री. लक्ष्मण पवार, गोरक्षक सर्वश्री गोरख शिंदे, शरद देव, पप्‍पू कुष्‍टे, नागेश कुलकर्णी, अधिवक्‍ता भीमराव शिंदे, दीपक शहा, विनोद ओसवाल, रणजीत पाटील, प्रकाश पोरवाल, रवींद्र साने, तसेच पाटणचे प.पू. धारेश्‍वर महाराज आणि वृंदावन गोसंवर्धन संस्‍था यांनी या उपोषणास त्‍यांचा पाठिंबा दर्शवला आहे.