केमाल पाशाने तुर्कस्तानात स्वतःच्या नेतृत्वाखाली नवीन शासनाची निर्मिती केली. त्यासाठी त्याने एक प्रस्ताव ३ मार्च १९२४ या दिवशी मांडला. त्या वेळी तो म्हणाला, ‘‘कोणत्याही परिस्थितीत प्रजासत्ताक राज्य आपल्याला टिकवायचे आहे. ते संकटात आहे. मोडकळीला आलेल्या सांप्रदायिक पायावर ऑटोमन साम्राज्याची निर्मिती झाली होती. नव्या प्रजासत्ताकाचा पाया भक्कम असला पाहिजे. त्याची रचना शास्त्रशुद्ध असली पाहिजे. खलिफा आणि ओसमान राजघराण्याचे अवशेष गेले पाहिजेत. जुनीपुराणी सांप्रदायिक न्यायालये आणि कायदे रहित करून त्यांच्या ऐवजी आधुनिक नागरी संहिता आणली पाहिजे. मौलवींनी चालवलेल्या शाळांच्या ऐवजी असांप्रदायिक शासकीय शाळा स्थापन झाल्या पाहिजेत. संप्रदाय आणि शासन यांची फारकत केली पाहिजे.’’
१. केमाल पाशाने केलेल्या सुधारणा
अ. ऑटोमन आणि मुसलमान पारंपरिक टोपीला हद्दपार केले. त्याच्या जागी हॅट आली.
आ. सांप्रदायिक मठांकडे असलेली संपत्ती आणि भूमी जप्त केली. त्या भूमीवर उपजीविका वर्गाला कामाला लावले.
इ. इस्लामचा कायदा रहित केला. त्याच्या जागी जर्मनचा व्यापारी कायदा आला. इटालियन दंड विधान आले आणि स्विसची नागरी संहिता आली.
ई. बहुपत्नीकत्वाला बंदी घातली. जनानखाने बंद झाले.
उ. तुर्की भाषेत घुसलेल्या फारसी आणि अरबी शब्दांना हद्दपार केले.
ऊ. ‘कुराण’ आणि ‘बायबल’ यांचे तुर्की भाषेत अनुवाद केले.
ए. मशिदीतील प्रार्थना तुर्की भाषेत होऊ लागल्या.
ऐ. परकीय मिशनरी शाळा बंद केल्या. त्यांना धार्मिक शिक्षण देण्यास बंदी घातली.
ओ. अरेबिक लिपीची जागा सुधारलेल्या लॅटिन लिपीने घेतली.
२. केमाल पाशाप्रमाणे भारतात निधर्मी राज्य करायचे ठरवले तर ?
वरीलप्रमाणेच आपल्याकडे (भारतात) खर्या अर्थाने निधर्मी राज्य करायचे ठरवले, तर काय होईल ?
अ. नागरी संहिता अस्तित्वात आली, तर कोणता सांप्रदायिक कायदा रहित होईल ?
आ. बहुपत्नीकत्वावरची बंदी कुणाला बोचेल ?
इ. प्रादेशिक अथवा संस्कृत भाषेत धर्मग्रंथ आणि प्रार्थना आल्या पाहिजेत, असे ठरवले, तर कोणत्या ग्रंथांची अन् प्रार्थनांची भाषांतरे होतील ?
ई. परकीय संस्कृतीची चिन्हे असणारी नावे पालटण्याचे ठरले, तर कुणाची नावे पालटली जातील ?
उ. मिशनरी शाळांवर बंदी आली, तर कोणत्या शाळा बंद होतील ?
ऊ. भाषाशुद्धीची चळवळ झाली, तर प्रादेशिक भाषेतील कोणत्या शब्दांना डच्चू (वगळावे) द्यावा लागेल ?
ए. लिपी पालटायचे ठरवले, तर कोणती लिपी येईल?
३. निधर्मी राज्यासाठी पालट करणार का ?
निधर्मी राज्यासाठी असे पालट करावे लागतील. निधर्मीवादाचा ढोल पिटणार्यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि तशी कृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हेच पुरोगामित्व आहे, हे सुद्धा ध्यानात घेतले पाहिजे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.४.२०२३)