शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अयोग्य वागणूक दिल्याचे प्रकरण

मुंबई – पूर्वप्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षकांनी मारणे, ओरडणे किंवा चिमटे काढणे हे क्रूर असल्याचे नमूद करून शिक्षिकांच्या अशा वर्तनाविषयी उच्च न्यायालयाने खेद व्यक्त केला. तसेच पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अशी वागणूक देणार्या कांदिवली येथील पूर्वप्राथमिक शाळेतील शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला. ‘अल्पवयीन मुलांना क्रूर वागणूक दिल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो’, असे निरीक्षणही न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने या शिक्षिकेची याचिका फेटाळताना नोंदवले.

कांदिवली येथील पूर्वप्राथमिक शाळेत शिकणार्या दोन वर्षांच्या मुलाच्या पालकांनी याचिकाकर्तीविरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट होती. त्यानंतर याचिकाकर्तीने अटक टाळण्यासाठी आधी कनिष्ठ न्यायालय, नंतर उच्च न्यायालय येथे धाव घेतली. शाळेतील २ शिक्षिकांनी विद्यार्थ्याला मारले, तसेच चिमटे काढले. त्याच्या डोक्यावर पुस्तके आपटली, तर उचलून भूमीवर टाकले.