अध्‍यात्‍मातील स्‍त्री माहात्‍म्‍य !

मार्च मासामध्‍ये जागतिक महिला दिन साजरा झाला. सध्‍या ‘सुपर वुमन’चे प्रचंड कौतुक करतांना अनेक माता-भगिनी भारतीय स्‍त्रियांविषयी विविधांगांनी भरपूर लिहित आहेत; पण त्‍यांच्‍याकडून एका महत्त्वाच्‍या विषयावर अल्‍प लक्ष दिले गेले. तो विषय आहे अध्‍यात्‍म !

संत कान्होपात्रा

१. गोपींची आध्‍यात्मिक श्रेष्‍ठता !

‘भौतिक सुखांकडे लक्ष देतांना ज्‍या तत्त्वज्ञानाच्‍या पायावर आपली संस्‍कृती उभारलेली आहे, त्‍यातील श्रेष्‍ठ माता-भगिनींकडे आपण दुर्लक्ष केले. अनेकांना भगवान कृष्‍ण आणि गोपिका, गोकुळातील भगवंताच्‍या बाललीला, गोपींचे प्रेम आदींविषयी माहिती असते; पण गोपिकांची आध्‍यात्‍मिक थोरवी अनेकांना ठाऊकच नसते. आपल्‍यासाठी कृष्‍णाची तक्रार करणार्‍या आणि त्‍याच्‍याशी लीला करणार्‍या अशीच गोपींची ओळख असते; पण उद्धवासारख्‍या विद्वान भक्‍तश्रेष्‍ठाचे गर्वहरण करणार्‍या आणि त्‍यांच्‍या बुद्धीवरील पडदा दूर करून त्‍यांना आत्‍मसाक्षात्‍कार घडवणार्‍या गोपींकडे आपण दुर्लक्ष करतो.

वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

उद्धव हे योगेश्‍वरांचे अत्‍यंत जवळचे परमप्रिय भक्‍त होते. श्रीकृष्‍णाने जशी अर्जुनाला भगवद़्‍गीता सांगितली, तसा आध्‍यात्मिक उपदेश उद्धवालाही केला आहे. त्‍यालाच ‘उद्धवगीता’ म्‍हणतात. एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाला भगवंतांनी गोपींची समजूत घालण्‍याच्‍या निमित्ताने गोकुळात ज्ञानप्राप्‍तीसाठी पाठवले. त्‍याप्रमाणे गोपींनी उद्धवाला ज्ञानप्राप्‍ती करून दिली.

२. संत सोयराबाई, संत जनाबाई, संत कान्‍होपात्रा आणि संत मुक्‍ताबाई यांची अलौकिकता !

संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्‍या धर्मपत्नी. ‘अवघा रंग एक झाला’, हा अभंग त्‍यांचाच. संत जनाबाई, संत कान्‍होपात्रा, संत मुक्‍ताबाई या सर्वांची चरित्रे अभंग दिव्‍य आणि अलौकिक आहेत. या माध्‍यमातून त्‍यांनी त्रिकालाबाधित सत्‍य असे तत्त्वज्ञान दिले. संत तुलसीदास अनेकांना ज्ञात असतात; पण त्‍यांच्‍या आयुष्‍याला संपूर्ण कलाटणी देणारी त्‍यांची पत्नी रत्नावली अनेकांना ठाऊक नसते. या सर्व ‘सुपरवुमन’ नाहीत का ? १०० टक्‍के आहेत. या सर्वांनी त्‍यांचा संसार करत असतांना उपासनाही केली. त्‍यांनी प्रपंचासमवेत परमार्थही साध्‍य केला आणि तो वेगळ्‍या उंचीवर नेऊन ठेवला. या सर्वजणी विद्वान होत्‍या. त्‍यांनी समाजाला शाश्‍वत सुखाचा मार्ग दाखवला.

३. भौतिक सुखे क्षणभंगूर !

भौतिक सुखे आज आहेत; पण उद्या असतीलच, याची शाश्‍वती नाही. आज जे सुख वाटते, तेच ४ दिवसांनी दु:ख वाटते. याविषयी एक उदाहरण सांगतो. आज आपण २५ सहस्र रुपयांचा एक भ्रमणभाषसंच घेतो. त्‍यानंतर त्‍यातील नवीन तंत्रज्ञान (फिचर्स) सर्वांना कौतुकाने सांगतो. ४ दिवसांतच त्‍याहून अधिक ‘फिचर्स’ असलेला आणि किंमतीतही अल्‍प असलेला भ्रमणभाषसंच बघतो. तेव्‍हा आपण स्‍वतःलाच घाई केल्‍याविषयी दूषणे देतो. जे सुख ४ दिवसांपूर्वी होते, त्‍याचे ४ दिवसांत दु:खात रूपांतर होते; पण अध्‍यात्‍मात तसे नाही. तेथे केवळ आनंदच असतो.’

–  वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग (११.३.२०२३)