१ मे पासून ‘शिर्डी बंद’ची हाक !

शिर्डीतील साई मंदिरासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा दिल्याचे प्रकरण

शिर्डी (जिल्हा नगर) – येथील साई मंदिराच्या सुरक्षेसाठी साई संस्थान आणि महाराष्ट्र पोलीस ऐवजी ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’ची (‘सी.आय.एस्.एफ्.’ची) सुरक्षा व्यवस्था देण्याच्या हालचाली चालू आहेत; मात्र याला शिर्डीकरांचा विरोध आहे. शिर्डीकरांनी आक्रमक पवित्रा घेत १ मे पासून शिर्डी शहर बेमुदत बंद ठेवण्याची चेतावणी दिली आहे. तोडगा न निघाल्यास १ मे या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळ ग्रामसभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

१. शिर्डी मंदिराला वारंवार धमक्या येत असल्याने तेथे महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षारक्षक, ‘कमांडो’, बाँबशोधक पथक यांच्यासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे; मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ‘साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.

२. न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा देण्यास सिद्धता दर्शवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने निधी जमावण्यासाठी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते.

३. शिर्डी बंदच्या काळात साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, तसेच भोजन व्यवस्था चालू रहाणार आहे.