प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अनेक हत्या, खंडणी, धमकावणे आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारा कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची १५ एप्रिलच्या रात्री ३ जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. लवलेश तिवारी, सनी सिंह आणि अरुण मौर्य अशी या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही गुंड असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद होते आणि ते कारागृहातही जाऊन आले होते. या तिघांनी अतिक आणि अश्रफ यांना ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत ठार मारल्यावर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. या हत्येमागे एक सूत्रधार असल्याची प्राथामिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर आरोपींनी पोलिसांना जबाब दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले, ‘अतिक अहमद याचे पाकिस्तानशी लागेबंधे होते. पाकची आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, तसेच गुप्तचर संघटना आय.एस्.आय. यांच्याशी त्या दोघांचा संबंध होता. अतिक आणि त्याची टोळी यांनी अनेक निरापराध्यांचा जीव घेतला आहे. अतिक भूमी बळकवण्यासाठी हत्या घडवून आणल्या आहेत. त्याच्या विरोधात जबाब देणार्यांनाही तो त्रास द्यायचा. त्याचा भाऊ अश्रफदेखील असेच करायचा. यासाठीच आम्ही त्या दोघांची हत्या केली.’
#LIVE FIR में दावा- अतीक-अशरफ का मर्डर नाम कमाने के लिए: आरोपी बोले- कई दिनों से मीडियाकर्मी बनकर घूम रहे थे, मौका मिलते ही मार दिया#UttarPradesh #Prayagraj #AtiqueAhmed #AshrafAhmed https://t.co/JPngHrd07f pic.twitter.com/E8gG0j4fbh
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 16, 2023
सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा
अतिक आणि अश्रफ यांना ठार मारणार्यांपैकी एका आरोपीच्या नातेवाइकाला अतिक याने मारले होते. त्यामुळे त्याचा सूड उगवण्यासाठी अतिकला मारले, अशी माहिती या आरोपीनेे पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तीनपैकी कोणत्या आरोपीने हे सांगितले ?, हे मात्र समजू शकले नाही. पोलीस याविषयी अधिक चौकशी करत आहेत.
तिघे एकत्र कसे आले ?
तिघेही आरोपी वेगवेगळ्या उत्तरप्रदेशातील जिल्ह्यांत रहाणारे आहेत. लवलेश तिवारी हा बांदा येथे, सनी हा हमीरपूरमध्ये, तर अरुण मौर्य कासगंज येथे रहाणारा होता. त्यामुळे त्यांची आपापसांत ओळख कशी झाली ?, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. तिघांचे वय २० ते २५ वर्षे आहे. या तिघांनी हत्येच्या दोन दिवस आधी प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये रहाण्यासाठी भाड्याने खोली घेतली होती. या तिघांनी हत्येसाठी ज्या मोटार सायकलचा वापर केला होता, ती सरदार अब्दुल मन्नान खान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही दुचाकी त्यांना कुणी आणि कुठून आणून दिली होती ?, याचा शोध घेतला जात आहे. यातील सनी सिंह जेव्हा एका प्रकरणात कारागृहात होता, तेव्हा त्याची ओळख कुख्यात गुंड सुंदर भाटी याच्याशी झाली होती. सनी याच्यावर सुंदर भाटी टोळीसाठी गुन्हे केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी वापरली भारतात बंदी असलेली विदेशी पिस्तुल !
अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येसाठी आरोपींनी ‘जिगाना’ या पिस्तुलचा वापर केला. ही पिस्तुल तुर्कीयेमध्ये बनवलेली असून याची किंमत ६ लाख रुपये आहे. या पिस्तुलवर भारतात बंदी आहे. तस्करीद्वारे ती भारतात आणली जाते. यात एकाच वेळी १७ गोळ्या भरता येतात. अशाच पिस्तुलचा वापर गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत करण्यात आला होता. या पिस्तुलाचा वापर मलेशिया, अझरबैजान आणि फिलिपाईन्स या देशांच्या सैन्याकडून केला जातो. हे पिस्तुल स्वयंचलित (ऑटोमेटिक) असते आणि त्यातून एकाच वेळी अनेक गोळ्या झाडतात येतात.
तुर्की की zigana made पिस्टल से हुई अतीक और अशरफ की हत्या, तुर्की से अवैध तस्करी कर लाया जाता है भारत | @arvindojha https://t.co/IcDbDErOdx
— AajTak (@aajtak) April 16, 2023
आम्ही त्याला सोडून दिले आहे ! – लवलेश तिवारी याच्या वडिलांचा दावा
आरोपी लवलेश तिवारी याचे वडील यज्ञ तिवारी यांनी सांगितले की, आम्हाला काहीही ठाऊक नसून आमचा लवलेशशी काही संबंध नाही. त्याचा घराशी काहीही संबंध नव्हता. आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्याशी बोलणे बंद केले आहे. तो एका प्रकरणात कारागृहात गेला, तेव्हापासून त्याच्याशी संभाषण बंद आहे. तो अमली पदार्थांचे सेवन करतो. आम्ही त्याला सोडून दिले आहे. तो कधीतरी घरी यायचा. ५-६ दिवसांपूर्वी घरी आला होता. तो काहीच काम करत नव्हता. अतिक हत्याकांडात तो सहभागी असल्याची माहिती आम्हाला टीव्हीवरून समजली.
१७ पोलीस निलंबित
पोलिसांच्या संरक्षणात असतांना अतिक आणि अश्रफ यांची हत्या करण्यात आल्याने उत्तरप्रदेश सरकारने या वेळी संरक्षणात तैनात असणार्या १७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना निलंबित केले आहे. हत्येच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.