ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान !

पिता-पुत्र यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त झाल्याचे एकमेव उदाहरण !

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी मुंबई – ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२’ हा महाराष्ट्राचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. १६ एप्रिल या दिवशी खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पाेरेट मैदानावर हा अविस्मरणीय सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीगण, सचिन धर्माधिकारी या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रगीताने सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रारंभी अमित शहा यांनी सोनचाफ्यांचा हार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना श्रीरामाची प्रतिमा दिली. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमित शहा यांना वाघाची प्रतिमा दिली. या वेळी डॉ. नानासाहेन धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने  डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. आप्पासाहेब यांना अयोध्यामधील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिमा भेट दिली. यानंतर अमित शहा यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला.

पुरस्काराचे स्वरूप !

२५ लाख रुपयांचा धनादेश, शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पिता-पुत्र यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त झाल्याचे एकमेव उदाहरण !

पिता-पुत्र यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त झाल्याचे एकमेव उदाहरण आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांचे पूत्र डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे पिता-पुत्र यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त झाल्याचे हे एकमेव उदाहरण होय!

लाखो भाविकांची उत्तम सुव्यवस्था !

या आनंद सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतांना या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, वाहतूक व्यवस्था आदी सेवांचे उत्तम सुनियोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे २५० टँकरद्वारे पाण्याची सुविधा देण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी २ सहस्र १०० नळ बसवण्यात आले होते. आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर, १०० परिचारिका  आणि कर्मचारी कार्यरत होते. ३२ फिरती शौचालये, ४ सहस्र २०० पोर्टेबल शौचालय, तसेच कार्यक्रमस्थळी ९ सहस्र तात्पुरते शौचालय बांधण्यात आले होते. स्वच्छतेसाठी ४ सहस्र स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते.

महाराष्ट्रातील सामाजिक चेतनेला आप्पासाहेब धर्माधिकारी हे भगीरथाप्रमाणे पुढे नेत आहेत ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकरबंधू, लोकमान्य टिळक यांनी स्वराज्यासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले. समर्थ रामदासस्वामी, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने भक्तीचा मार्ग दाखवला. यासह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी सामाजिक कार्याचा वसा महाराष्ट्राने दिला. या सामाजिक चेतनेला पुढे नेण्याचे भगीरथ कार्य डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

अमित शहा

या वेळी अमित शहा म्हणाले,

१. देशविदेशांतील इतिहासामध्ये एकाच कुटुंबावर लक्ष्मीदेवीची कृपा झालेली आपण पाहिले आहे. अनेक कुटुंबांमध्ये वीर जन्माला आले आहेत. एकाच कुटुंबामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत सरस्वतीदेवीची कृपा झालेली आपण पाहिली आहे; परंतु समाजसेवेचा संस्कार ३ पिढ्यांपर्यंत राहिलेले धर्माधिकारी कुटुंब मी प्रथमच पाहिले. या पुरस्काराने लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे.

२. उपनिषदांमध्ये ‘‘ॐ सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात ।’’(अर्थॅ : सर्व सुखी होवोत. सर्व निरोगी राहोत. सर्व जण चांगल्या घटनांचे साक्षीदार असोत आणि कधी कुणाच्या जीवनात दु:ख येऊ नये), असे म्हटले आहे; परंतु प्रत्यक्ष जीवनात हे अंगीकारणे कठीण आहे. आप्पासाहेबांनी समाजातील मोठ्या घटकांना समाजासाठी जगायला शिकवले आहे.

३. भाषणातून दिलेले शिकवण अल्पजीवी असते; परंतु कर्तृत्वातून दिलेली शिकवण चिरंजीवी असते. आप्पासाहेबांनी लाखो जणांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा स्वत:च्या कृतीतून दिली आहे. कोणतीही लोकषणा आणि अपेक्षा यांविना समाजसेवा करणार्‍या लाखो लोकांचा असा समूह आतापर्यंतच्या जीवनात मी कधीही पाहिला नाही.

४. अशा प्रकारचा भक्ती-भाव केवळ त्याग, समर्पण आणि सेवा यांतूनच येतो आणि तो आप्पासाहेब यांच्यामध्ये आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांचे संस्कार आणि कर्तृत्व यांचा सन्मान आहे.

५. ‘गर्दीचे अनुकरण करू नका, गर्दीला तुमचे अनुकरण करू द्या’, असे म्हटले जाते. आप्पासाहेबांनी हे प्रत्यक्ष करून दाखवले.

पुरस्कार देऊन सरकारने कृतज्ञता व्यक्त केली ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, पैशाने माणूस धनवान होत नाही. खरी श्रीमंती संस्कारांत आहे. ही श्रीमंती श्री परिवारात अनुभवायला मिळते. डॉ. नानासाहेब आणि डॉ. आप्पासाहेब यांच्या विचारांची श्रीमंती घेऊन श्री परिवार जीवन जगत आहे. या संप्रदायाच्या निरूपणातून मानवाला सकारात्मकता मिळत आहे. पाश्चात्त्य जगाला बाजार समजतात. ‘जो मजबूत असेल, तो जगेल’, असे पाश्चात्त्य मानतात; परंतु ‘जो जन्माला आला, तो जगेल’, हा भारताचा विचार आहे. आप्पासाहेब हाच विचार सातत्याने मांडत आहेत. दासबोधाच्या निरुपणातून त्यामुळे कोट्यवधी लोकांमध्ये आप्पासाहेबांनी संस्काराचे रोपण केले आहे.

अशी मिळाली ‘धर्माधिकारी’ पदवी !

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पिढीला ४५० वर्षांचा इतिहास आहे. आप्पासाहेबांच्या ८ पिढ्यांपूर्वी यांचे पूर्वज गोविंद चिंतामणि चांण्डिल्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात धर्मजागृतीचे काम करत होते. त्यांचे धर्मजागृतीचे कार्य पाहून महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी महाराजांच्या प्रेरणेने त्यांना सांगितले की, तुम्ही केवळ ‘चाण्डिल्य नाही, तर ‘धर्माधिकारी’ आहात. तेव्हापासून यांच्या घराण्याला प्राप्त झालेली ‘धर्माधिकारी’ पदवी अद्यापही आहे, असे या वेळी भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केलेले मनोगत

देश आणि समाज यांचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवाकार्य करणे आवश्यक ! – डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ निरूपणकार

देश आणि समाज यांचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवाकार्य करणे आवश्यक आहे. हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असून माझ्या कार्याची नोंद घेऊन ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला आहे; कारण कार्य श्रेष्ठ आहे. हा कार्याचा सन्मान आहे. याचे श्रेय आपल्या सगळ्यांना जाते. ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणे हे महाराष्ट्रात कुठेच झालेले नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे कार्य चालू ठेवणार आहे. देश आणि समाज यांचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने समाजाच्या सेवेचे कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ५ झाडे लावावीत. रक्तदान शिबिरामध्ये सेवा धर्म रुजवावा, पाण्यासाठी बंधारे बांधावेत, स्वच्छता अभियान राबवावे. ज्या प्रमाणे आपण बाह्य स्वच्छता करतो, तशी अंतःकरणाचीही स्वच्छता करणे आवश्यक आहे. यासाठी आपले मन स्थिर करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे, तरच आपण सर्वगुणसंपन्न होऊ. (या वेळी आप्पासाहेब यांनी पुरस्काराची २५ लाख रुपयांची रक्कम ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ला देत असल्याचे घोषित केले.)

राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी आहे. तिचे उदाहरण म्हणजे हा अफाट जनसागर आहे. राजकीय गोष्टीला आध्यात्मिक अधिष्ठान आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे ‘रेकॉर्ड’ आप्पासाहेबांचे सदस्यच मोडू शकतात. या सर्व श्री सदस्यांमध्ये आप्पासाहेब यांच्या रूपाने देव दिसत आहे. धर्माधिकारी कुटुंब भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारी दीपस्तंभ आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे. यामुळे महाराष्ट्राचा सन्मानही वाढला आहे. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा आहे. सूर्य आग ओकत असतांना एकही माणूस जागेवरून उठत नाही, हे आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत. सर्व सदस्य शिस्तीचे पालन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात देशाचे नाव करत आहेत, तसे आप्पासाहेब जगात सेवेच्या माध्यमातून भारताचा लौकिक वाढवत आहेत.

माझ्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला, त्या वेळी आनंद दिघे यांनी मला आधार दिला, तर आप्पासाहेब यांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे त्यांचे मोठे योगदान आहे. आप्पासाहेब यांच्या कार्याची नोंद केंद्र सरकारनेही घेतली आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा परिचय !

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे थोर निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे कार्य पाहून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला. या बैठकांमधून रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपण केले जाऊ लागले. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पश्चात त्यांचा वारसा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे पुत्र सचिनदादा धर्माधिकारी यांनी चालू ठेवला आहे. श्री समर्थ बैठकातून संत शिकवण देतांनाच नैतिकता, निर्भयता, नम्रतेची शिकवण त्यांनी दिली. सामाजिक कार्याची व्यापकता वाढवण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा’ या संस्थेची स्थापना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही त्यांच्या अनुयायांपैकीच एक आहेत.

अप्पासाहेबांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डी. वाय. पाटील विद्यापिठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. माजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली होती. युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटने अप्पासाहेबांना ‘लिव्हिंग लिजंड’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.