|
छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहन पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. ३ दिवसांत ५६० वाहनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ६७ वाहने अयोग्य स्थितीतील होती. अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘आर्.टी.ओ.’च्या पथकातील अधिकार्यांनी चालक आणि मालक यांचे समुपदेशन करून ही वाहने परत पाठवली, तसेच योग्य उपाययोजना करूनच वाहन रस्त्यावर चालवावे, अशी ताकीदही देण्यात आली आहे.
समृृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर मार्गावरील शहरांत ये-जा करण्याचा वेळ अल्प झाला आहे; मात्र वाहनांची पडताळणी न करता वाहने वेगात चालवली जातात. त्यामुळे भीषण अपघात होऊन मृृत्यूमुखी पडणे, तसेच गंभीर घायाळ होऊन कायमचे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. सर्व स्तरांवरून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. आर्.टी.ओ. प्रशासनाने १० एप्रिलपासून १० दिवस वाहन पडताळणी आणि चालक यांचे समुपदेशन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. २० एप्रिलपर्यंत वाहन पडताळणी मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे.