सोलापूर येथे माहेश्वरी समाजाचा ‘प्रीवेडिंग शुटींग’वर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – येथील माहेश्वरी समाजाने एकत्र येत वधूवरांच्या ‘प्रीवेडिंग शुटींग’वर (लग्नापूर्वीच्या छायाचित्रणावर) बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. येथील माहेश्वरी सांस्कृतिक भवन येथे माहेश्वरी समाजाची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. (पैसे अनावश्यक व्यय होऊ नयेत आणि अयोग्य प्रथा वाढू नयेत यासाठी माहेश्वरी समाजाने स्तुत्य निर्णय घेतल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! – संपादक) येथील माहेश्वरी प्रगती मंडल, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महासभा, माहेश्वरी युवा संघटन, राजस्थानी विकास मंडल, मारवाडी युवा मंच, माहेश्वरी महिला शाखा, युवा शाखा या समाजाच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विवाह सोहळ्यात अनावश्यक पैसे व्यय होतात, तसेच अन्नाचीही नासाडी होते. त्यामुळे यापुढे विवाह समारंभात भोजन पदार्थांची संख्या १३ एवढी मर्यादित ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व समाजबांधवांनी दोन्ही हात वर करून दोन्ही ठराव संमत केले.

संपादकीय भूमिका

माहेश्वरी समाजाने घेतलेल्या निर्णयाचा आदर्श प्रत्येक समाज घेईल तो सुदिन  !