गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मद्यसेवनामुळे उद्भवणारे आजार झालेले ५-६ रुग्ण प्रतिदिन होतात भरती
पणजी, ११ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात मद्यसेवनामुळे प्रतिवर्षी सरासरी ३०० जणांचा मृत्यू होतो. वर्ष २०१८ पासून ही संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे राज्याचे एक प्रथितयश रुग्णालय म्हणून गणल्या गेलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रतिदिन मद्यसेवनामुळे यकृत रोगग्रस्त झालेले (अल्कोहोलिक लिव्हर डिसीज) ५-६ रुग्ण भरती होत असतात.
वर्ष २०२२ मध्ये रस्ते अपघातामुळे २७१ जणांना प्राण गमवावा लागला, तर मद्यसेवनामुळे यकृत रोगग्रस्त झाल्याने ३१८ जणांचा मृत्यू झाला. जीवघेण्या वाहन अपघातांपेक्षाही मद्यसेवनाची समस्या अधिकच गंभीर आहे. ‘अल्कोहोलिक लिव्हर डिसीज’मुळे मृत्यू ओढवल्याची वर्षनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. वर्ष २०१५ मध्ये २६१, २०१६ मध्ये २८१, वर्ष २०१७ मध्ये २८३, वर्ष २०१८ मध्ये ३३६, वर्ष २०१९ मध्ये ३४०, वर्ष २०२० मध्ये ३२५, वर्ष २०२१ मध्ये ३५६ आणि वर्ष २०२२ मध्ये ३१८. प्राप्त आकडेवारीनुसार प्रत्येक मासात गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ५ सहस्र ५०० रुग्ण भरती होतात आणि यामधील २५ टक्के रुग्ण हे मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असतात. काही वर्षांपूर्वी ४० ते ५० वर्षे वयोगटातील रुग्ण मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असल्याचे आढळायचे; मात्र आता २० वर्षे वयाचे तरुणही मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असतात.
Over 300 deaths/year: Booze kills more than road accidents in Goa
GMC also sees five to six medium to severe cases of alcohol-related illnesses every day. And doctors say liver cirrhosis deaths have only gone up since 2018.https://t.co/XaCH40T1yE
— The Times Of India (@timesofindia) April 11, 2023
मद्यसेवनामध्ये गोवा देशात ६ व्या स्थानी !
पणजी, ११ एप्रिल (वार्ता.) – मद्यसेवनामध्ये गोवा देशात ६ व्या स्थानी असल्याचे केंद्रशासनाच्या ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५’ या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशात अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे ५३ टक्के पुरुष, तर २४ टक्के महिला मद्यसेवन करतात, तर लक्षद्वीप आणि गुजरात येथे सर्वांत अल्प प्रमाणात मद्यसेवन केले जाते.
गोव्यात सरासरी ३६.८ टक्के पुरुष, तर ५.५ टक्के महिला मद्य सेवन करतात !
या अहवालानुसार गोव्यातील सरासरी ३६.८ टक्के पुरुष मद्य पितात. शहरी भागातील ३८.१ टक्के, तर ग्रामीण भागातील ३४.८ टक्के पुरुष मद्याच्या आहारी गेले आहेत. राज्यातील ५.५ टक्के महिला मद्याचे सेवन करतात. त्यामध्ये शहरी भागातील ५.६ टक्के, तर ग्रामीण भागातील ५.३ टक्के महिला मद्य पितात.
केंद्रशासनाचा ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५’ अहवाल –
अहवालातील अन्य सूत्रे
१. ग्रामीण भागातील लोक शहरी भागाच्या तुलतेन अधिक मद्यसेवन करतात.
२. देशात अनुसूचित जमातीतील लोक इतर जमातींपेक्षा अधिक मद्यसेवन करतात.
३. मद्यसेवनाची धर्मनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. हिंदु २० टक्के, मुसलमान ५ टक्के, ख्रिस्ती २८ टक्के, शीख २३.५ टक्के, बौद्ध २४.५ टक्के, जैन ५.९ टक्के आणि इतर ४७ टक्के.
४. देशात आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या ५ राज्यांमध्ये देशभरात विक्री होत असलेल्या एकूण मद्याच्या ४५ टक्के मद्याचे सेवन केले जाते.
संपादकीय भूमिका
|