महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या उत्तरप्रदेशातील पोलीस हवालदारावर गुन्हा नोंद

पीडितेला ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलीस शिपाई असणार्‍या पत्नीवरही गुन्हा नोंद

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील पोलीस हवालदार पन्नालाल याने ३ वर्षे एका महिलेचे लैंगिक शोषण केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेला ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी त्याच्या शिपाई असणार्‍या पत्नीवरीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (पतीने लैंगिक शोषण केलेल्या पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिला धमकावणारी महिला ही स्त्री जातीला लागलेला कलंक ! – संपादक) पन्नालाल याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी केली जात आहे. पीडित महिला येथील एका खासगी रुग्णालयात काम करते.

एका प्रकरणाच्या वेळी पन्नालाल यांची या महिलेशी ओळख झाली होती आणि नंतर तो नेहमीच तिला संपर्क करत होता. त्याने तो विवाहित असल्याचेही लपवले होते. पन्नालाल याने या महिलेशी लैंगिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्या आधारे तो तिचे सातत्याने शोषण करू लागला. नंतर त्याने एका मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो तिचा छळ करत होता. तिच्याकडून त्याने पैसेही उकळले होते. ‘पन्नालाल विवाहित आहे’, हे महिलेला लक्षात आल्यावर तिने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे पन्नालाल आणि त्याची पत्नी यांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.

संपादकीय भूमिका

रक्षक नव्हे, भक्षक असलेले पोलीस !