पणतू पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांनी जिज्ञासेने विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांना घडवणार्‍या  पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

मंगळुरू येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांचा चैत्र कृष्ण चतुर्थी (१० एप्रिल) या दिवशी ८६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालसंत (वय ५ वर्षे) पू. भार्गवराम यांच्याशी झालेले संभाषण येथे देत आहोत.

सौ. भवानी भरत प्रभु
पू. भार्गवराम भरत प्रभु

 

पू. राधा प्रभु यांनी एक चित्र काढले होते आणि त्याविषयी त्या त्यांचा पणतू पू. भार्गवराम प्रभु यांना पुढीलप्रमाणे समजावून सांगत होत्या. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या पुढील परिसरात नंदी, कामधेनू, गरूड आणि पुष्पक विमान थांबले आहे. आपत्काळात संकटात असणार्‍यांना साहाय्य करण्यासाठी श्रीविष्णूने त्यांना देवलोकातून भूलोकात पाठवले आहे. श्रीविष्णूने त्यांचे पूजन करून, त्यांना कुंकुमतिलक लावून, फुलांची माळ घालून, औक्षण करून आणि त्यांना आशीर्वाद देऊन पाठवले आहे.  साधक हे बघण्यासाठी बाहेर आलेले असतांना पू. भार्गवराम आणि त्यांची पणजी पू. राधा प्रभुही तिथेच आहेत.’ त्यांचे बोलणे झाल्यावर पू. भार्गवराम यांनी जिज्ञासेने विचारलेले प्रश्न आणि त्यावर पू. राधा प्रभुआजी यांनी त्यांना दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांनी काढलेल्या चित्रात नंदी, कामधेनू, गरूड आणि पुष्पक विमान दाखवले आहे.

पू. भार्गवराम : पणजी, इथे सर्व जण काय करत आहेत ?

पू. राधा प्रभु (पणजी) : देवलोकातून श्री विष्णूने नंदी, कामधेनू, गरुड आणि पुष्पक विमान पाठवले आहे. ते पहाण्यासाठी इथे सर्व साधक गोळा झाले आहेत.

पू. भार्गवराम : श्री विष्णूने हे सर्व का पाठवले आहे पणजी ?

पू. राधा प्रभु : पुढे भीषण आपत्काळ येणार आहे. त्या वेळी लोकांना (साधकांना) कोणताही त्रास होऊ नये; म्हणून त्याने हे पाठवले आहे.

पू. भार्गवराम : पणजी, श्रीविष्णु किती चांगले आहेत ना !

पू. राधा प्रभु : हो बाळा. ते देव आहेत ना ! आपण त्यांचे भक्त आहोत. त्यांना त्यांच्या भक्तांवर पुष्कळ करुणा आहे. भक्तांना असहनीय त्रास झाल्यास त्यांना रडू येते.

पू. भार्गवराम : देव आपल्यासारखे रडतात का ?

पू. राधा प्रभु : हो बाळा, आपल्या प्रिय भक्तांना पुष्कळ त्रास झाल्यास देवही रडतो आणि लगेच त्यांच्या त्रासाचे निवारण करतो.

पू. भार्गवराम : हो, मी काल खेळतांना पडलो. मला काही लागले नाही. देवानेच माझे रक्षण केले. हो ना पणजी ?

पू. राधा प्रभु : तुला काही दुखले नाही, तर तू काय केलेस ?

पू. भार्गवराम : मी लगेच कृतज्ञता व्यक्त केली.

पू. राधा प्रभु : चांगले केलेस.

पू. भार्गवराम : नंदी आपल्यावर कोणते उपकार करतो ?

पू. राधा प्रभु : नंदी भगवान शिवाचे वाहन आहे. भगवान विष्णूने शिवाला विचारून नंदी घेतला आहे. नंदी आपत्काळात अन्न, वस्त्र, पाणी इत्यादी आवश्यक वस्तू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊन देतो. मार्गातील अडथळे निर्माण करणारे मोठमोठे दगड आपले बळ आणि शिंगे यांनी तो उचलून नेईल.

पू. भार्गवराम : ट्रकमधून साहित्य घेऊन जाऊ शकतो ना ?

पू. राधा प्रभु : आपत्काळात पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. त्यामुळे ट्रक तिकडे नेता येणार नाही.

पू. भार्गवराम : कामधेनू काय करते ?

पू. राधा प्रभु : कामधेनू सर्वांना हवे तेवढे दूध देते. एवढेच नव्हे, तर ती आपण जे मागू, ते देते.

पू. भार्गवराम : ती कशी देते ?

पू. राधा प्रभु : ती देवलोकातील गाय आहे. आपण मनात जी इच्छा करू, ते देव लगेच तिला देतो.

पू. भार्गवराम : गरुड पक्षी काय साहाय्य करतो ?

पू. राधा प्रभु : गरुड हे श्रीविष्णूचे वाहन आहे. त्याच्या पाठीवर बसून विष्णु जिथे हवे, त्या लोकात जाऊ शकतो. आपत्काळात मनुष्याला साहाय्य करण्यासाठी विष्णूने त्याला भूलोकात पाठवले आहे.

पू. भार्गवराम : पुष्पक विमान काय करते ? ते कोण चालवते ?

पू. राधा प्रभु : पुष्पक विमानही देवलोकातून आले आहे. त्यात बसून बाळ आपल्या आईकडे जाऊ शकते.

पू. भार्गवराम : ते कसे ?

पू. राधा प्रभु : आपत्काळात बाळ आणि आई वेगवेगळ्या ठिकाणी असल्यास ते मूल त्या विमानात बसून ‘पुष्पक विमाना, मला माझ्या आईकडे घेऊन जा’, असे म्हणताच ते मुलाला आई कितीही दूर असली, तरी घेऊन जाते.

पू. भार्गवराम : ते वेगाने जाते ?

पू. राधा प्रभु : ते मनोवेगाने जाते.

पू. भार्गवराम : देवाची लीला किती चांगली आहे ना ?

पू. राधा प्रभु : देवाची लीला पुष्कळच चांगली आहे. देवलोकातून आलेले नंदी, कामधेनू हे भूमीवर चालतात. गरुड आणि पुष्पक विमान आकाशात संचार करतात.

पू. भार्गवराम : तुम्ही एकदा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे सांगितले होते. हे सर्व करणारे तेच आहेत ना ?

पू. राधा प्रभु : हो. ही त्यांचीच अगाध कृपा आहे. त्यांनी आपल्या भक्तांसाठी काय केले आहे, हे तुला पुढे पहायला मिळेल.

पू. भार्गवराम : परात्पर गुरुदेवांकडून आपल्याला पुष्कळ शिकायला मिळते ना ?

पू. राधा प्रभु : हो बाळा, आता आपण सर्व जण मिळून त्यांना सामूहिक कृतज्ञता व्यक्त करूया.

दोन्ही संतांचे संभाषण ‘देवलोकामध्येच चालू आहे’, असे वाटणे

‘जे काही ईश्वराने आम्हाला दिले आहे, त्याबद्दल कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची ? प्रत्येक गोष्टीचे किती महत्त्व असते ? त्या प्रती आम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे’, हे या संभाषणातून शिकायला मिळते. दोन्ही संतांचे संभाषण वाचून ‘देवलोकामध्येच हे संभाषण चालू आहे’, असे मला वाटले.’

– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू (२५.४.२०२०)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची संभाषणाबद्दल प्रतिक्रिया !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पू. राधा प्रभु यांनी पू. भार्गवराम याला दिलेली त्याच्या प्रश्नांची उत्तरे मलाही देता आली नसती. पू. राधा प्रभु यांच्या उत्तरातून मलाही पुष्कळ शिकायला मिळाले. यासाठी मी त्यांना नमस्कार करतो !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ( २४.३.२०२३)