पुणे – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट कामामुळे खडकवासला येथील बाह्यवळण रस्त्यावर पुन्हा एक अपघात झाला आहे. या अपघातात अनिकेत वायकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक विशाल पालकर हा तरुण गंभीर घायाळ झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्यवळण रस्त्याचे काम केले; मात्र या पुलाचे काम करण्यात आलेले नाही. सदर पूल अंदाजपत्रकात नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या खडकवासला गावातील मुख्य रस्त्याचे काम चालू असल्याने पूर्ण वाहतूक या बाह्यवळण रस्त्यावरून चालू आहे. सदर अरुंद पुलाच्या ठिकाणी प्रतिदिन वाहतूककोंडी होत असून वाहने रस्त्यावरून खाली घसरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने नवीन पूल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर यांनी सांगितले की, अपघाताविषयी माहिती मिळाली असून नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल.
संपादकीय भूमिकानागरिकांचे मृत्यू होऊ देणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास काय चूक ? |