भटक्या कुत्र्यांची दहशत !

भटके कुत्रे

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली, तरी कुत्र्यांची दहशत प्रशासन संपवू शकले नाही, हे चिंताजनक आणि संतापजनक आहे. कुत्रा चावल्यामुळे पसरणारा ‘रेबिज’ हा एक विषाणूजन्य आजार आहे. रॅबिज हा रुग्णाच्या शरिरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर आक्रमण करतो. यामुळे रुग्णाच्या मेंदूत आणि मणक्यात सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एखाद्या व्यक्तीला रॅबिजची लक्षणे दिसल्यानंतर तो जवळपास १०० टक्के घातक असतो. महत्त्वाचे म्हणजे ९९ टक्के प्रकरणांमध्ये रॅबिज विषाणू मानवांमध्ये प्रसारित करण्यासाठी पाळीव कुत्रे उत्तरदायी असतात. आजही प्रतिवर्षी भारतात रॅबिजमुळे २१ सहस्रांपेक्षा अधिक मृत्यू होतात. जगातील सर्वाधिक श्वानदंशाचे प्रमाण भारतात आहे. श्वानदंशानंतर रॅबिजने होणारा मृत्यू टाळण्यासाठी लसीचा प्रभावी वापर कसा करावा ? याविषयी अज्ञान आहे. वर्ष २०३० पर्यंत रॅबिजचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक पातळीवर हालचाली चालू आहेत; परंतु भारतात तो केवळ गोवा, अंदमान आणि सिक्कीममध्येच संपुष्टात आला आहे. पाश्चिमात्यांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सिंगापूर, स्टॉकहोम, शिकागो, सिडनी येथे भटक्या कुत्र्यांची संख्या शून्य आहे. त्यांनी लक्षावधी कुत्री मारून हा प्रश्न सोडवलेला नाही, तर त्यांनी ३ पातळ्यांवर हा प्रश्न सोडवला आहे. एक बंदिस्त कचरा, दुसरा कुत्र्यांसाठी परवाना अनिवार्य, तिसरा कुत्र्यांचे सामुदायिक लसीकरण !

एकदा कुत्र्यांची संख्या नियंत्रित झाली, म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी समस्या अल्प होते. भारतातूनही रॅबिज हद्दपार करणे शक्य आहे; पण यासाठी सरकारी यंत्रणांनी कृतीशील प्रयत्न करणे अपेक्षित आहे. भारतातील जनतेची मानसिकता आणि जनतेसाठी योग्य काय आहे ? यावर अभ्यास करून तशी कृती केली, तरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटेल; परंतु हे करतांना राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे, तरच या सर्व गोष्टी साध्य होतील !

(तुमच्या गावात किंवा शहरात भटक्या कुत्र्यांची अशी समस्या नाही ना, याची खात्री करा ! – संपादक)

– सौ. अपर्णा जगताप, पुणे (७.४.२०२३)