मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पोलीस पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू !

संगीता डवरे (डावीकडे)

पुणे – मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पोलीस पत्नी संगीता डवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू होते. संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असतांना पाम बीच मार्गावर नाकाबंदीच्या वेळी भरधाव गाडीखाली चिरडले जाऊन गंभीर जखमी झाले होते. गाडीचालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संगीता यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली होती, तसेच त्यांनी राज्य सरकारकडेही न्याय मागण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टरांनी पतीवर योग्य उपचार केले नाहीत. वर्ष उलटून गेले तरी पतीला चालता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांवरही कारवाई करा, अशी तक्रार त्यांनी केली होती. उपचाराच्या पैशांची देयकेही पोलीसदलाने संमत केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्मदहनाची चेतावणीही दिली होती; मात्र त्यांनी दिलेल्या चेतावणीलाही गांभीर्याने न घेतल्याने अखेर त्यांनी मंत्रालयासमोर जाऊन विष प्राशन केले. (चेतावणी देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारीही कठोर शिक्षेस पात्र आहेत. असंवेदनशील अधिकार्‍यांचा जनतेला कधीतरी आधार वाटेल का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

पोलीसदलात कार्यरत असणार्‍या व्यक्तीलाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेची काय अवस्था ? हे सर्व पालटण्यासाठी कर्तव्यदक्ष, संवेदनशील अधिकारी हवेत !