वारंवार मिळणार्‍या पुढच्या दिनांकांमुळे त्रस्त आरोपीने न्यायाधिशांच्या दिशेने भिरकवली चप्पल !

कुर्ला येथील महानगरदंडाधिकारी न्यायालयातील प्रकार !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – न्यायालयात निकालाऐवजी वारंवार पुढील दिनांक (तारखा) मिळत असल्यामुळे वैतागलेल्या आरोपीने न्यायाधिशांच्या दिशेने चप्पल भिरकवली. १ एप्रिल या दिवशी कुर्ला येथील महानगरदंडाधिकारी अ.अ. धुमळेकर यांच्यावर आरोपी जावेद सुभाष शेख उपाख्य प्रदीप तायडे याने चप्पल फेकल्याची घटना घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी जावेद याच्यावर दोन पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. यांतील एका प्रकरणात त्याने ५ वर्षांची शिक्षा भोगली; मात्र दुसर्‍या गुन्ह्यातील खटल्यामध्ये त्याला सतत पुढील दिनांक मिळत आहेत. १ एप्रिल या दिवशी खटल्याचा निकाल लागत नसल्यामुळे जावेद यांनी वरील निंदनीय कृत्य केले.

संपादकीय भूमिका

आरोपीचे कृत्य दंडनीय आहे. त्यासह यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली निघण्यासाठीही सरकारने ठोस उपयायोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !