चैत्र शुक्ल एकादशी (१.४.२०२३) या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सागर निंबाळकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. श्रद्धा निंबाळकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. सागर निंबाळकर यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रतिकूल परिस्थितीतही साधना करणे
‘श्री. सागर यांची घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून वर्ष २००१ पासून पूर्णवेळ साधना चालू केली. वर्ष २००७ मध्ये माझ्या सासरी घराचे बांधकाम चालू होते आणि पैशांचीही आवश्यकता होती. त्याच वेळी त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार होती; परंतु त्यांच्या मनाला नोकरीचा विचारही शिवला नाही. मध्यंतरी वेळोवेळी अनेक आर्थिक, तसेच अन्य अडचणी आल्या. त्या वेळी ‘गुरु आपला हात कधीच सोडणार नाहीत’, या अढळ श्रद्धेने त्यांनी अडचणींना तोंड दिले.
२. सेवेची तळमळ
यजमानांनी काही दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पत्रकार आणि संपादक’ म्हणून सेवा केली आहे. आता ते अन्य सेवा करतात. एकदा आम्ही काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. वाटेत एका गटाचा मोठा मोर्चा चालू होता. ते पाहून त्यांनी त्वरित गाडी थांबवली. मला भ्रमणभाषमध्ये मोर्च्याची छायाचित्रे काढायला सांगून ते स्वतः ती बातमी घेण्यासाठी गेले. त्यांनी ती बातमी सिद्ध करून बातमी आणि मोर्च्याचे छायाचित्र पनवेल येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात पाठवून आम्ही आमची वैयक्तिक कामे करण्यासाठी पुढे गेलो. कुठेही काही बातमी असेल, तर त्यांना त्यांच्यातील पत्रकार शांत बसू देत नाही.
३. इतरांना तत्परतेने साहाय्य करणे
मध्यंतरी एकदा कोल्हापूरमध्ये पूर आला होता. तेव्हा आम्ही कोल्हापूरमध्येच घरी होतो. त्या वेळी गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘पूर विशेषांक’ काढणार होते; परंतु स्थानिक पत्रकार उपलब्ध नसल्याने माहिती गोळा करणे अडचणीचे जात होते. तेव्हा ‘गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयातून त्यांना पुराच्या संदर्भातील वेगवेगळे लेख देऊ शकता का ?’ असे विचारले होते. त्या वेळी तत्परतेने पुराच्या ठिकाणी जाऊन विशेषांकाला आवश्यक असणारे सर्व लिखाण त्यांनी संकलन करून पाठवले, तसेच त्या समवेत आवश्यक छायाचित्रेही पाठवली. ते इतर सेवा करत असले, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख लिहिण्यासाठी ते आवर्जून वेळ काढतात.
४. राष्ट्राभिमान
जे चित्रपट राष्ट्र आणि धर्म यांवर आधारित असतात, तेव्हा ते पहिल्याच दिवशी पाहून लगेच त्याचे समीक्षण करून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापण्यासाठी लेख देतात. एक दिवस आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पहायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी मध्यंतराच्या वेळी बाहेर जाऊन प्रेक्षकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांचे अभिप्रायही छापण्यासाठी दिले. त्यांनी केलेले समीक्षण उत्तम असते.
५. पत्नीला स्वभावदोष निर्मूलनासाठी साहाय्य करणे
माझ्यामध्ये ‘इतरांचे दोष पहाणे, बहिर्मुखता, पूर्वग्रह, नकारात्मक विचार करणे’ हे स्वभावदोष तीव्र आहेत. यासंबंधीचे माझे सेवा करतांना झालेले प्रसंग मी यजमानांना सांगितल्यावर ते माझे नेमके कुठे चुकले याविषयी अचूकपणे सांगतात आणि मी काय प्रयत्न करायला हवेत, तेही सांगतात.
‘यजमानांच्या या सर्व गुणांचा वापर गुरुकार्यासाठी होऊन त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांना गुरुचरणी स्थान मिळू दे, हीच त्यांच्या वाढदिवशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
– सौ. श्रद्धा निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२३)