सातारा येथील चिमणपुरा पेठ परिसरातील रस्‍त्‍यांची चाळण झाल्‍यामुळे नागरिक त्रस्‍त !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २७ मार्च (वार्ता.) – येथील चिमणपुरा पेठ परिसरात भुयारी गटार योजनेची कामे चालू आहेत. यामुळे चिमणपुरा पेठ परिसरातील रस्‍त्‍यांची अक्षरश: चाळण झाली आहे. कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. (प्रशासनाला हे दिसत नाही का ! – संपादक)

शहरातील बोगदा परिसर, नलवडे निवास, श्रीदत्त मंदिर, भोईगल्ली समाजमंदिर ते खारी विहीर, ढोणे वसाहत, मांढरे आळी, मनामती चौक या परिसरात सांडपाणी वाहून नेण्‍यासाठी भुयारी गटार योजनेची कामे चालू आहेत. याठिकाणचे नागरिक हैराण झाले असून अनेकांना श्‍वसनाचे त्रास चालू झाले आहेत. गेल्‍या १ मासापासून हे काम अत्‍यंत संथ गतीने चालू आहे. मध्‍यंतरीच्‍या अवकाळी पावसाने तर पेठेतील नागरिकांना रडवले. भुयारी गटार कामामुळे कुणाची नळजोडणी तुटत आहे, तर कुणाची येण्‍या-जाण्‍याची गैरसोय होत आहे; मात्र ठेकेदाराला याच्‍याशी काही देणे-घेणे नाही. काही ठिकाणी तर वादाचे प्रसंग उद़्‍भवत आहेत.

रस्‍त्‍यावर इथून-तिथून मोठमोठाली खडी टाकण्‍यात आली आहे. त्‍यावरून छोट्या-मोठ्या वाहनांना ये-जा करावी लागत आहे. त्‍यामुळे काही वेळा वाहने पंक्चर होत असून नागरिकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत आहे. ज्‍यांची नळजोडणी तुटली आहे, त्‍यांच्‍या पिण्‍याच्‍या आणि दैनंदिन उपयोगाच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला असून नळजोडणी करून लवकरात-लवकर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी पेठेतील नागरिक करत आहेत.