लांजा येथे ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर’ यांच्या ‘हिंदु पंचांग दिनदर्शिके’चा प्रकाशन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा !

हिंदु पंचांग दिनदर्शिका
‘हिंदु पंचांग दिनदर्शिके’चे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. अशोक पाखरे, श्री. कुमार जोगळेकर, ह.भ.प. दादा रणदिवे, पू. (श्रीमती) माया गोखले, श्री. लक्ष्मण स्वामी आणि श्री. सुनील जंगम

लांजा, २७ मार्च (वार्ता.) – चैत्र शुक्ल पंचमीला (२६ मार्चला) येथील बसवेश्वर सदनात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर प्रकाशित मराठी महिन्यांची हिंदु पंचांग दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन येथील ‘हिंदु सकल समाज’च्या वतीने करण्यात आले होते.

प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दादा रणदिवे, श्री. वीरशैव समाज लिंगायत स्वामी मठाचे श्री. लक्ष्मण गंगाधर स्वामी, सुप्रसिद्ध ज्योतिषी आणि वेदमूर्ती सुनील जंगम, विश्व हिंदु परिषद दक्षिण रत्नागिरीचे सहमंत्री अनुक्रमे श्री. कुमार जोगळेकर आणि श्री. अशोक पाखरे या सर्वांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. वेदमूर्ती श्री. सुनील जंगम यांनी वेदमंत्रपठणाद्वारे देवतांचे स्तवन केले.

प्रास्ताविक करतांना श्री. महेश मयेकर आणि उपस्थित हिंदु धर्मप्रेमी

सोहळ्याच्या प्रास्ताविकात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश मयेकर म्हणाले की, गेले ३ वर्षे मराठी हिंदु पंचांग दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद लाभत आहे.

या प्रास्ताविकानंतर व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते हिंदु पंचांग दिनदर्शिकेचे मंगलमय वातावरणात प्रकाशन करण्यात आले.

या वेळी ह.भ.प. दादा रणदिवे यांनी ‘आपल्या आयुष्यामध्ये मराठी हिंदु पंचांगाप्रमाणे आपण आचरण करावे’, असे आवाहन केले.

पंचांगाचे अभ्यासक श्री. गणपत बुचडे यांनी तिथी, नक्षत्र, वारांची कालमापन पद्धती आणि त्यामागील शास्त्र यांची विस्तृत माहिती सांगितली.

दिनदर्शिकेविषयी विश्व हिंदु परिषद दक्षिण रत्नागिरीचे सहमंत्री श्री. कुमार जोगळेकर म्हणाले, ‘‘अशा तर्‍हेचे पंचांग काढण्याचा उपक्रम वनवासी कल्याण आश्रम गेली अनेक वर्षे करत आहे. तथापि आपण सगळ्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. त्यामुळे उच्च सनातन संस्कृतीचे रक्षण निश्चितच होईल.’’

यानंतर ज्योतिषी आणि वेदमूर्ती सुनील जंगम यांनीही विचार मांडले. श्री. रूपेश गांगण यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. पूर्वा मुळे, रत्नागिरीतील हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते, लांजा येथील बजरंग दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, तसेच मान्यवर ग्रामस्थ मिळून १५० नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता लिंगायत यांनी केले.

क्षणचित्रे

१. ओणी कोंडीवळे येथील मठाधिपती पू. उल्हासगिरी महाराज यांचे आशीर्वादपर मनोगत या वेळी वाचून दाखवण्यात आले .

२.  सनातनच्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांचा सन्मान विश्व हिंदु परिषदेच्या लांजा प्रखंड मंत्री कु. प्रियवंदा जेधे यांनी केला.