‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत ग्रंथांच्‍या वितरणाची सेवा करतांना साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला आलेली अनुभूती

‘सप्‍टेंबर २०२१ पासून गुरुकृपेने माझ्‍याकडून ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत सनातनचे मोठे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्‍या वितरणाची सेवा झाली. यासाठी एका साधिकेने मराठी, हिंदी आणि इंग्रजी ग्रंथांची नावे अन् त्‍यांचे मूल्‍य असलेली सूची बनवली. ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत ग्रंथांच्‍या वितरणाच्‍या सेवेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सौ. वनिता धोत्रे

१. ग्रंथांच्‍या वितरणाच्‍या सेवेला जाण्‍यापूर्वी भावजागृतीचा प्रयोग करणे

प्रथम मला गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्‍मरण होत असे. तेव्‍हा मी एक छोटासा भावजागृतीचा प्रयोग करत असे. त्‍यामध्‍ये मी कधी ‘सूक्ष्मातून गुरुदेवांच्‍या नखाच्‍या पोकळीत बसून चैतन्‍य ग्रहण करत आहे’, तर कधी ‘गुरुदेव दत्तरूपात माझ्‍या समोर असून त्‍यांना आळवत आहे’, असे प्रयोग करत असे. त्‍यानंतर मी गुरुदेवांना प्रार्थना करून सेवेला जात असे.

२. वेगवेगळ्‍या ठिकाणी  ग्रंथांच्‍या वितरणाचे नियोजन करणे

अ. मी नोकरीच्‍या ठिकाणी जेवणाच्‍या सुटीत ग्रंथांच्‍या वितरणासाठी प्रयत्न चालू केलेे. त्‍या वेळी मी काही मोजकेच ग्रंथ माझ्‍या समवेत नेत असे. तेव्‍हा ‘ते ग्रंथच गुरुकार्य करत असत’, असे मला वाटायचे. मी जिज्ञासूंना ग्रंथसूची दाखवत असे. मी प्रतिदिन माझ्‍या नवीन सहकार्‍याला भेटत असे. तेव्‍हा सरासरी २ – ३ ग्रंथ वितरित होत असत. मी इंग्रजी भाषिकांना इंग्रजी आणि मराठी भाषिकांना मराठी ग्रंथसूची दाखवून ग्रंथांची मागणी घेत असे.

आ. मी आगगाडीतून येता-जाता ग्रंथांचे वितरण करत असे.

इ. मी वैयक्‍तिक कामासाठी सोनार आणि शिंपी यांच्‍याकडे गेल्‍यावर तिथेही ग्रंथ दाखवत असे.

ई. मी आधुनिक वैद्यांकडेही ग्रंथांचे वितरण करत असे.

३. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी वेळोवेळी दिशादर्शन केल्‍यामुळे प्रतिदिन ग्रंथांचे वितरण होणे

सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी मला वेळोवेळी दिशादर्शन केले. त्‍यामुळे गुरुकृपेनेच प्रतिदिन ग्रंथांचे वितरण व्‍हायचे. त्‍यातून मला आनंद आणि चैतन्‍य मिळून दुसर्‍या दिवशी सेवा करण्‍यासाठी उत्‍साह मिळत असे. संपूर्ण अभियानात लघु आणि मोठे, असे पुष्‍कळ ग्रंथ वितरित झाले.

‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत ग्रंथांच्‍या वितरणाची सेवा गुरुदेवांनी करून घेतली’, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वनिता धोत्रे, मुलुंड, मुंबई. (३०.१२.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक