पणजी, २३ मार्च (वार्ता.) – उन्हाळ्यामध्ये होणारी पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी साळावली धरणाची उंची वाढवणे, तसेच राज्यात आणखी ४-५ लहान धरणे बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती सरकारच्या वतीने नुकतीच देण्यात आली आहे; मात्र पर्यावरणप्रेमींच्या मते साळावली धरणाची उंची वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार आहे.
पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘साळावली धरणाची उंची वाढवल्यास पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सुटणार नाही; मात्र याने पर्यावरण नष्ट होणार. याउलट सरकारने ओसाड भूमीवर वृक्षारोपण करून वृक्षांची वाढ करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे पाण्याची साठवणूक होऊन, त्याचा पुढे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वेळी वापर होऊ शकतो. नेत्रावळी अभयारण्य हे साळावली धरणाला टेकून आहे. धरणाची उंची वाढवल्यास त्याचा विपरीत परिणाम अभयारण्य, तसेच त्याच्या आसपासची लोकवस्ती यांवर होणार आहे.’’
(सौजन्य : Dainik Gomantak TV)
प्रा. राजेंद्र केरकर यांच्या म्हणण्याला दुजोरा देतांना पर्यावरणतज्ञ अभिजीत प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘अमेरिका, युरोप आदी देशांनी अनुभव आणि विज्ञान यांच्या आधारावरून धरणे न बांधण्याचे धोरण अवलंबले आहे.’’ कार्यकर्त्या निर्मला सावंत म्हणाल्या, ‘‘सरकारने आणखी नवीन धरणे बांधण्याऐवजी सध्या असलेल्या धरणांची डागडुजी करावी आणि आणखी अधिक बंधारे बांधावेत.’’