भगवान मत्‍स्‍याचा जन्‍म !

कोटी कोटी प्रणाम !

आज २४ मार्च २०२३ या दिवशी ‘मत्‍स्‍य जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने…

भगवान मत्‍स्‍याचा जन्‍म !

‘चैत्र शु. ३ या दिवशी भगवान मत्‍स्‍याचा जन्‍म झाला. श्री विष्‍णूच्‍या दशावतारांतील हा पहिला अवतार होय. ‘दुष्‍टांचा संहार आणि सज्‍जनांचे रक्षण करून धर्मसंस्‍थापनेसाठी ईश्‍वर अवतार घेत असतो’, असा भारतियांचा विश्‍वास आहे. २५ व्‍या कल्‍पाच्‍या शेवटी ब्रह्मदेवाची रात्र चालू झाली आणि सर्वत्र प्रलयकाळ चालू होऊन स्‍वर्ग, पृथ्‍वी आदि सर्व लोक बुडून गेले. सर्वत्र अधर्माचरण माजून अंदाधुंदी चालू झाली. ब्रह्मदेव निद्रिस्‍त असतांना त्‍याच्‍या मुखांतून जे वेद बाहेर पडले, ते हयग्रीव दैत्‍याने पळवले. त्‍याचा संहार करण्‍यासाठी भगवान विष्‍णूने मत्‍स्‍यावतार घेतला.

या वेळी सत्‍यव्रत नावाचा सम्राट होता. हा तपस्‍वी राजा एकदा कृतमाला नदीत स्नान करून तर्पण करत असता त्‍याच्‍या ओंजळीत एक मत्‍स्‍य आला. राजा त्‍याला नदीत फेकणार तेवढ्यात तो मत्‍स्‍य म्‍हणाला, ‘‘ राजा, माझे रक्षण कर .’’ तेव्‍हा आपल्‍या कमंडलूमधून राजा त्‍याला घरी घेऊन गेला; पण घरी येताच त्‍या मत्‍स्‍याचा देह वाढू लागला. पुढे कमंडलू, विहीर आणि सरोवर या सर्वांमध्‍ये तो मासा मावेनासा झाला. तेव्‍हा राजाने चकित होऊन विचारले, ‘‘ तू कोण आहेस ?’’ यावर मत्‍स्‍य भगवान म्‍हणाले, ‘‘आजपासून ७ व्‍या दिवशी प्रलय येईल. त्‍या वेळी मी एक नौका पाठवेन. त्‍यात तू आणि सप्‍तर्षि बसा.’’ यानंतर भगवान अदृश्‍य झाले आणि बरोबर ७ व्‍या दिवशी समुद्र एकाएकी वाढून सर्व पृथ्‍वी पाण्‍यात बुडून गेली. ठरल्‍याप्रमाणे सत्‍यव्रताला पाण्‍यात एक नाव दिसली. त्‍यात तो सप्‍तर्षींसह चढला. त्‍या वेळी राजाने भगवान मत्‍स्‍याची स्‍तुती केली. प्रलयकाळाच्‍या शेवटी भगवंताने हयग्रीव दैत्‍याला मारले आणि त्‍याच्‍याकडील वेद घेऊन ते ब्रह्मदेवाला दिले. सत्‍यव्रत राजाला भगवान मत्‍स्‍याने जे ज्ञान दिले, ते मत्‍स्‍य पुराणात सापडते.’

(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’)