मोगलांवर वेब सिरीज काढणे, हा हिंदूंंच्‍या जखमांवर मीठ चोळण्‍याचा प्रकार ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा, सातारा

आंदोलनादरम्‍यान आपले मनोगत व्‍यक्‍त करतांना विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर आणि उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठ मान्‍यवर

सातारा २३ मार्च (वार्ता.) – मोगलांचा भारतातील इतिहास हा अतिशय क्रूर आणि हिंदूंंवर अनन्‍वित अत्‍याचार करणारा आहे. मोगलांनी हिंदूंंवर केलेल्‍या अत्‍याचारी इतिहासाऐवजी त्‍यांचा परिवार, राजकारण, व्‍यक्‍तिमत्त्व आदी गोष्‍टींवर प्रकाश टाकणारी ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ ही वेब सिरीज ‘झी-५’ या ओटीपी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित करण्‍यात येत आहे. ज्‍या मोगलांनी हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करण्‍याचा, हिंदूंंचा वंशविच्‍छेद करण्‍याचा प्रयत्न केला, अशा मोगलांवर वेब सिरीज काढणे, हे हिंदूंच्‍या जखमांवर मीठ चोळण्‍याचाच प्रकार असल्‍याचे परखड प्रतिपादन रणरागिणी शाखेच्‍या सौ. रूपा महाडिक यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने सातारा येथील गोलबाग, राजवाडा येथे आयोजित हिंंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात बोलत होत्‍या.

सातारा येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागात गत अनेक वर्षांपासून श्री सरस्‍वतीदेवीची मूर्ती धुळखात पडून आहे. या जागेत अडगळीचे साहित्‍य रचण्‍यात आले असून दिवसभरात अनेक अधिकारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात; मात्र त्‍यांना या विषयी काहीच वाटत नाही का ? विद्येच्‍या प्रांगणातच शिक्षण विभागाकडून असा प्रकार होत असेल, तर यासारखे दुर्दैव ते काय ? असा प्रतिप्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी उपस्‍थित केला. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, तसेच समितीच्‍या सौ. भक्‍ती डाफळे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात महिला आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.