मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – सूतगिरण्या चालू होण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने ४५ टक्के भांडवल, तर अधिकोषाकडून ४० टक्के कर्ज आणि वैयक्तिक ५ टक्के अशा प्रमाणात भांडवल गुंतवून सूतगिरणी चालू होते. सूतगिरण्या सुरळीत चालू रहाव्यात, यासाठी आगामी काळात राज्यशासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी जाईल, अशी कार्यप्रणाली आखण्यात येईल, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २३ मार्चला विधानसभेत दिली. काँग्रेसचे सदस्य बळवंत वानखेडे आणि भाजपचे योगेश सागर यांनी संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी पुन्हा चालू करण्याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता.
आधारभूत किंमत व्यतिरिक्त धानउत्पादक शेतकर्यांना प्रतिहेक्टरी १५ सहस्र प्रोत्साहनपर रक्कम ! – रवींद्र चव्हाण, मंत्री
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – राज्यातील धान उत्पादक शेतकर्यांना आधारभूत किमतीच्या व्यतिरिक्त प्रतिहेक्टरी १५ सहस्र रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राजू कारेमोरे, शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आदी सदस्यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकर्यांना प्रोत्साहनपर रकमेच्या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यातील शेतकर्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम देण्यात येते. राज्यातील शेतकर्यांचा शेतीचा वाढता व्यय आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे धान उत्पादक शेतकर्यांना ‘आधारभूत किंमत योजने’च्या अंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त राज्यशासनाकडून प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकर्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १५ सहस्र रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ही रक्कम शेतकर्यांना देण्यात येत आहे.