सर्वांशी प्रेमभावाने वागणारी ५१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळीची अमरावती येथील कु. भार्गवी योगेश मालोकर (वय १२ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. भार्गवी योगेश मालोकर ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०१६ मध्‍ये कु. भार्गवी योगेश मालोकर हिची आध्‍यात्‍मिक पातळी ५१ टक्‍के होती.’ – संकलक)

कु. भार्गवी योगेश मालोकर

१. घरकामांत साहाय्‍य करण्‍याची आणि नवीन पदार्थ शिकण्‍याची आवड असणे

‘कु. भार्गवीला घरकामांत साहाय्‍य करायला आवडते. ती घरातील सर्व कामे उत्‍साहाने करते. ‘स्‍वयंपाक करणे’ हा तिचा आवडीचा विषय आहे. जेवणातील बहुतेक सर्व पदार्थ तिला करता येतात. तिला नवीन पदार्थ शिकायला आणि ते करून पहायला आवडतात.

श्री. योगेश मालोकार

२. कुटुंबियांना साहाय्‍य करणे

भार्गवीच्‍या आईला तीव्र आध्‍यात्‍मिक त्रास आहे. त्‍यामुळे ती सतत रुग्‍णाईत असते. भार्गवी आईची सेवा मनापासून करते. ती आजी-आजोबांचीही काळजी घेते.

३. इतरांच्‍या कृतीचे कौतुक करणे

इतरांनी केलेल्‍या चांगल्‍या कृतींचे भार्गवी मनापासून कौतुक करते. स्‍वयंपाकातील पदार्थ चांगले झाल्‍यास ती आजी आणि आई यांचे कौतुक करते.

४. निसर्ग आणि प्राणी यांविषयी प्रेम

भार्गवीला झाडांची पुष्‍कळ आवड आहे. ती वेगवेगळी झाडे लावते आणि त्‍यांचे संगोपन उत्‍साहाने करते. तिला गाय आणि कुत्रा यांंना खायला द्यायला आवडते. परिसरातील एका कुत्र्याशी तिची चांगली मैत्री आहे. एकदा पाऊस पडत असतांना कुत्र्याची पिल्ले पावसात भिजत होती. तेव्‍हा ‘त्‍यांना काही होऊ नये’ यासाठी भार्गवी रडत रडत देवाला प्रार्थना करत होती.

५. सर्वांशी प्रेमभावाने वागणे

घरात भार्गवीच्‍या आवडीचा एखादा पदार्थ केल्‍यास ती आधी इतरांना देते. आम्‍ही रहातो, त्‍या ठिकाणी भार्गवीची लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीपर्यंत सर्वांशी चांगली मैत्री आहे.

६. देवावर श्रद्धा आणि कठीण काळात सकारात्‍मक विचार करणे

अ. भार्गवी मधेमधे देवाला प्रार्थना करते आणि स्‍तोत्रे म्‍हणते. घरात साजरे केले जाणारे सगळे सण आणि उत्‍सव यांमध्‍ये ती उत्‍साहाने सहभागी होते. तिला देवतांची चित्रे काढायला आवडतात.

आ. आम्‍हाला संसार करतांना आर्थिक अडचणी येतात. त्‍या वेळी ‘यातून निश्‍चित मार्ग निघेल’, अशी भार्गवीची दृढ श्रद्धा असते. त्‍यामुळे ती मला (आईला, सौ. सोनाली यांना) सकारात्‍मक विचार देऊन आधार देण्‍याचा प्रयत्न करते.

७. भार्गवीच्‍या काही स्‍वभावदोषांमध्‍ये जाणवणारे पालट

भार्गवीला राग येण्‍याचे प्रमाण न्‍यून झाले आहे. ‘आळशीपणा’ या स्‍वभावदोषावरही तिने चांगल्‍या पद्धतीने मात केली आहे.

८. भार्गवीचे अन्‍य स्‍वभावदोष आणि अयोग्‍य कृती

उतावळेपणा, भावनाशीलता आणि भ्रमणभाष अन् दूरचित्रवाणी यांवरील कार्यक्रम पहाण्‍यात वेळ घालवणे.

‘हे श्रीकृष्‍णा, ‘भार्गवी तुझी पुत्री आहे’, या भावाने आमच्‍याकडून प्रत्‍येक कृती होऊ दे’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सोनाली आणि श्री. योगेश मालोकार (कु. भार्गवीचे आई-वडील), अमरावती (२०.२.२०२२)