श्रीपूजक माधव मुनीश्वर यांचे न्यायालयात सत्यप्रतिज्ञापत्रातून गंभीर आरोप
कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करणार, असे जिल्हाधिकार्यांनी घोषित केले होते. त्यानुसार काही अधिकारी मूर्तीची पहाणी करण्यासाठी उपस्थित होते. १४ मार्च २०२३ या दिवशी सकाळी ९ वाजता मूर्तीची पहाणी करतांना केंद्रीय पुरातत्व विभागाचे ४ अधिकारी उपस्थित होते आणि मी त्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित होतो. ही पहाणी करतांना त्यातील एका अधिकार्याने श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखावरील १८ सप्टेंबर २०२२ या दिवशी किंवा त्यापूर्वी केलेल्या संवर्धनाचा लेप काढला, तसेच नाकावरचा लेपही काढला, असा गंभीर आरोप श्रीपूजक माधव मुनीश्वर यांनी न्यायालयात सत्य प्रतिज्ञेवर केला आहे.
श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीच्या संवर्धनाविषयी ८ सप्टेंबर २०२२ या दिवशी सहदिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे. त्यात ‘श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर संवर्धनाचे काम घाईगडबडीने करण्यात आले आहे. यामुळे मूर्तीची हानी झाली आहे’, असा आरोप करण्यात आला आहे. त्या दाव्यावरील सुनावणीत १५ मार्च २०२३ या दिवशी माधव मुनीश्वर यांचे सत्यप्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली असून पुढील सुनावणी २१ मार्चला होणार आहे.