सिंधुदुर्ग : कुडाळ रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता आणि पूल यांची उंची वाढवण्यासाठी ३ कोटी निधी संमत

पावसाळ्यात पुरामुळे रस्ता बंद झाल्याने होणारी असुविधा टळणार !

पावसाळ्यात पुराच्या वेळी डॉ. आंबेडकर नगर येथील रस्ता अशा प्रकारे जलमय झालेला असतो

कुडाळ – कुडाळ शहर आणि कुडाळ रेल्वेस्थानक, तसेच बाव अन् बांबुळी या गावांना जोडणार्‍या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील रस्त्याची आणि तेथील पुलाची उंची वाढवण्यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने ३ कोटी रुपये निधीला मान्यता दिली आहे, अशी माहिती कुडाळ नगरपंचायतीचे भाजपचे गटनेता विलास कुडाळकर यांनी दिली.

भाजपचे गटनेता विलास कुडाळकर

डॉ. आंबेडकर नगर येथील रस्ता आणि पूल यांची उंची अल्प असल्याने पावसाळ्यात येथील कर्ली नदीला पूर आल्यावर ते पाण्याखाली जातात. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन पुराचे पाणी ओसरेपर्यंत थांबावे लागते. ही समस्या सुटण्यासाठी गटनेते कुडाळकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या वेळी उभयतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्या अनुषंगाने नुकत्याच घोषित झालेल्या अर्थसंकल्पात या कामांसाठी ३ कोटी रुपये निधी संमत झाल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.