अंबाजोगाई येथे नागरिकांचा निषेध मोर्चा
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – अंबाजोगाई तालुक्यात ६ वर्षीय बालिकेवर ६० वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ‘आरोपीला फाशीची शिक्षा द्या’ या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला संघटना, रोटरी क्लब, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. (अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यानेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अल्प होत नाही, हे प्रशासनाला समजेल तो सुदिन ! – संपादक)
अंबाजोगाई तालुक्यात ६ वर्षांच्या बालिकेला चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मागील सप्ताहात घडली. पीडित बालिका अंबाजोगाई येथे इयत्ता पहिलीत शिकते. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २ मार्च या दिवशी आरोपीने मुलीवर अत्याचार केले आणि कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित आरोपी विष्णु बाबूराव साळुदे याला पोलिसांनी अटक केली आहे. ६ मार्च या दिवशी आरोपीला न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.