मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – खासदार संजय राऊत यांना विधीमंडळाने दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटीसेवर स्पष्टीकरण देण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत केली. मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात येणार ? याविषयीचा कालावधी मात्र अध्यक्षांनी घोषित केलेला नाही.
प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ‘विधीमंडळ हे चोरमंडळ’ असल्याचे वक्तव्य केल्याच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात १ मार्च या दिवशी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला होता. यावरून विधीमंडळाकडून राऊत यांना नोटीस देण्यात आली होती. यावर ८ मार्च या दिवशी विधानसभेत निर्णय घोषित करण्यात येणार होता. याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी कालावधी वाढवून देण्याच्या केलेल्या विनंतीवरून संजय राऊत यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
संजय राऊत पत्रात म्हणाले, ‘‘खुलासा करण्यासाठी आपण मला ३ मार्चपर्यंत सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मुदत दिली होती. मी ४ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर होतो आणि कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. मी संपूर्ण विधान मंडळाविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकरणाविषयी सविस्तर खुलासा करण्याविषयी मुदतवाढ द्यावी.