‘आई’ला ‘आई’ अशी हाक मारून पूर्णत्‍व अनुभवा !

१. ‘आई’ या शब्‍दामागील सर्वांगसुंदर अर्थ !

८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्‍या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्‍ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची ! आजच्‍या युगात या ‘आई’ नावाच्‍या व्‍यक्‍तीरेखेला विविध नावांनी संबोधले जाते. आई, मम्‍मी, मॉम, मम्‍मा, मॉमी (‘मम्‍मी’ शब्‍दाचा झालेला अपभ्रंश) अशा नावांनी आजची पिढी आपल्‍या ‘आई’ला संबोधित असते. ‘आई’ म्‍हटले की, चेहर्‍यावर कसेनुसे भाव आणले जातात. तसे म्‍हणण्‍यास लाज वाटते. इतके का हे संबोधन हीन दर्जाचे आहे ? अशांना ‘अर्धवट इंग्रजाळलेले लोक’ याहून वेगळे काय म्‍हणणार ? हिंदु धर्मशास्‍त्रात ‘आई’ या शब्‍दाचा अर्थ ‘आत्‍मा + ईश्‍वर या दोघांचा संगम म्‍हणजे आई’ इतक्‍या सुस्‍पष्‍टपणे सांगितलेला आहे. आई या शब्‍दाला अर्थपूर्णता आहे; पण अन्‍य शब्‍दांना अर्थहीनता आहे. मग असे शब्‍द का बरे उच्‍चारावेत ? केवळ पाश्‍चात्त्यांच्‍या अंधानुकरणासाठी ? कि ‘आम्‍ही आधुनिक विचारांचे आहोत’, हे दाखवण्‍यासाठी ? कशाला इतका आटापिटा करायचा ?

२. ‘आई’ या शब्‍दातील गोडवा, माया, ममत्‍व, वात्‍सल्‍य हे अन्‍य शब्‍दांमध्‍ये नाही !

सौ. नम्रता दिवेकर

‘मम्‍मी’चा अर्थ तरी ठाऊक आहे का तुम्‍हाला ? मम्‍मी म्‍हणजे मृत झालेला मानव !  ‘मम्‍मी’ शब्‍द उच्‍चारणार्‍यांनी सांगावे की, मग आपली आई मृत आहे का ? ‘मम्‍मी’ म्‍हणूवन घेणार्‍या स्‍त्रियांनाही स्‍वतःला मृत म्‍हणवून घेणे आवडते का ? काही जण ‘मम्’ असे म्‍हणतात. तसे पहाता या शब्‍दाला अर्थ नाही; पण लहान मुलांच्‍या दृष्‍टीने ‘मम्’ म्‍हणजे पाणी ! असा अर्थ असलेला शब्‍द स्‍वतःसाठी उच्‍चारला जात असतांनाही त्‍यावर आक्षेप घेतला जात नाही. प्रत्‍येक मातेने या शब्‍दांच्‍या दृष्‍टीने विचार करायला हवा. ‘आई’ या शब्‍दातील गोडवा, माया, ममत्‍व, वात्‍सल्‍य हे अन्‍य शब्‍दांमध्‍ये नाही. त्‍यामुळे ‘आई’ या शब्‍दाची सर अन्‍य शब्‍दांना कधीच येऊ शकणार नाही. आता कुणी म्‍हणेल, ‘हाक कशीही मारा, प्रेम आणि ममता यांना महत्त्व आहे.’ असे जरी असले, तरी शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती या एकत्र असतात. त्‍यामुळे प्रत्‍येक शब्‍द त्‍या शक्‍तीनुसार त्‍याचे कार्य करतो, हे लक्षात घेऊन आपण शब्‍द अर्थपूर्ण वापरायला हवेत. ‘आई’ आणि ‘मम्‍मी’ हे शब्‍द काही काळ उच्‍चारून पहा ! तुम्‍हालाही त्‍यातील सामर्थ्‍य लक्षात येईल.

३. ‘आई’ आणि ‘आजी’ यांतील भेद लक्षात घ्‍या !

सध्‍याची काही मुले स्‍वतःच्‍या आईला ‘मम्‍मी’, तर आजीला ‘आई’ म्‍हणतात. ‘आई’ आणि ‘आजी’ दोघीही वेगळ्‍या आहेत. या शब्‍दांची सरमिसळ केल्‍यास लोण्‍याचा गोळा असणार्‍या नातवंडांना ‘आजी’ या शब्‍दातील सौंदर्य कधीच अनुभवता येणार नाही. ‘कशाचे इतके घेऊन बसलात ? काही फरक पडत नाही, सध्‍या सर्व चालते’, अशी दुर्लक्षित मानसिकता जोपासणारेही अनेक जण असतात. आता फरक पडत नसला, तरी ‘आई’ हे संबोधन कालांतराने लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहे, हेच सध्‍याचे चित्र आहे.

४. ‘मम्‍मी’, ‘मम्‍मा’ हे अलंकारांमध्‍ये बांधता न येणारे शब्‍द !

भारताच्‍या ऐतिहासिक वाटचालीत छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजामाता होती, सानेगुरुजींना सुसंस्‍कारांची शिदोरी देणारी ‘श्‍यामची आई’ म्‍हणून ओळखली गेली. श्रीकृष्‍णासारख्‍या महान अवताराला ममत्‍व देणारी यशोदामाता होती. ‘आईचे दूध’ ही संकल्‍पना पूर्वापार चालत आलेली आहे. कुणी ‘मम्‍मीचे दूध’ असे त्‍याला म्‍हणत नाही. कवी यशवंत यांनीही आईचे उत्‍कृष्‍ट वर्णन ‘स्‍वामी तिन्‍ही जगाचा आईविना भिकारी’, अशा स्‍वरूपात केले आहे. ‘मम्‍मी’, ‘मम्‍मा’ या शब्‍दांना अलंकारांमध्‍ये बांधता येत नाही. ‘मम्‍मी’ म्‍हणवून घेत असलेल्‍या स्‍त्रियांच्‍या कर्तृत्‍वाविषयी किंवा त्‍यांच्‍या कर्तबगारीविषयी काहीही आक्षेप नाही, हे स्‍त्रियांनी लक्षात घ्‍यावे. केवळ ‘आई’ म्‍हणून असलेल्‍या संस्‍कारांची शिदोरी ही प्रत्‍येक ‘आई’नेच जपून ठेवायला हवी.

५. ‘आई’च्‍या भाषेतच ‘आई’ला हाक मारा !

मातृभाषा मराठी असणार्‍यांना सांगावेसे वाटते की, मातृभाषा म्‍हणजे आईची भाषा ! मग ‘आई’ला ‘आई’च्‍या भाषेत नाही संबोधायचे, तर कुठल्‍या भाषेत संबोधायचे ? ‘आई’साठी ‘आई’ हा शब्‍दच योग्‍य आहे. त्‍याविना त्‍या हाकेलाही पूर्णत्‍व येत नाही, हेच खरे ! (८.३.२०२३)

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.