कोपरखैरणे येथील सनातनच्‍या साधिका सौ. तनुजा यादव यांचा महिलादिनाच्‍या निमित्ताने गौरव !

श्रीमती सुजाता ढोले यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना सौ. तनुजा यादव (उजवीकडे)

कोपरखैरणे – मागील ३० वर्षे सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून निरपेक्ष आणि सेवाभावी वृत्तीने राष्‍ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या कोपरखैरणे येथील सनातनच्‍या साधिका सौ. तनुजा यादव यांचा ८ मार्च या दिवशी महिलादिनाच्‍या निमित्ताने सन्‍मान करण्‍यात आला. महाराष्‍ट्र शासनाचा उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभाग, राज्‍याचे ग्रंथालय संचालनालयाचा मुंबई विभाग, ठाणे येथील जिल्‍हा ग्रंथालय आणि नवी मुंबई येथील प्रा. माणिकराव कीर्तन वाचनालय यांच्‍या वतीने जागतिक महिलादिनाच्‍या निमित्ताने समाजातील कर्तृत्‍ववान महिलांचा सत्‍कार करण्‍यात आला. यामध्‍ये सौ. तनुजा यादव यांनाही गौरवण्‍यात आले. वाशी येथील साहित्‍य मंदिराच्‍या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मानचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीमती सुजाता ढोले यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद़्‍घाटन झाले. ग्रंथालय संचालनालयाच्‍या मुंबई विभागाच्‍या साहाय्‍यक संचालिका श्रीमती शालिनी इंगोले या अध्‍यक्षा म्‍हणून कार्यक्रमाला उपस्‍थित होत्‍या. कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, ठाणे येथील जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील हे मान्‍यवर या वेळी व्‍यासपिठावर उपस्‍थित होते.