केपे, ३ मार्च (वार्ता.) – अवैध डोंगर कापणी आणि भूखंड विकास यांविषयी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी ३ मार्च या दिवशी केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. या वेळी ग्रामस्थांनी दोषींवर कारवाई करावी आणि उपजिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी करावी, अशा मागण्या केल्या. यानंतर उपजिल्हाधिकार्यांनी भरारी पथकासह डोंगर कापणीची पहाणी केली. या वेळी केपेचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामस्थांच्या मते गेल्या २ वर्षांपासून केपे परिसरात अनधिकृत डोंगर कापणीविषयी तक्रारी करूनही उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस आणि वन खाते अनधिकृत डोंगर कापणीकडे दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर म्हणाल्या, ‘‘ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीरपणे नोंद घेण्यात आलेली आहे. याविषयी तलाठी आणि मामलेदार यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. अनधिकृत डोंगर कापणीला आळा घातला जाणार आहे. लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये.’’ (वारंवार तक्रार करूनही प्रशासन अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष करत असेल, तर लोक आक्रमक होणे साहजिक आहे. त्यामुळे प्रशासनाने अवैध गोष्टींची तात्काळ नोंद घ्यावी, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिकावारंवार तक्रार करूनही अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष होणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे कि त्यांचे अवैध कृत्य करणार्यांशी साटेलोटे आहे ? |