बनावट बांधकामाचा नकाशा सिद्ध करून १४ कोटींची फसवणूक !

पुणे – करारनाम्‍याचे उल्लंघन करून, तसेच मालकी हक्‍काची मिळकत परस्‍पर विकून १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ‘गॅलेक्‍सी कन्‍स्‍ट्रक्‍शन अँड कॉन्‍ट्रॅक्‍टर्स’च्‍या दोन संचालकांच्‍या विरोधात चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून एकाला कह्यात घेतले आहे. तळमजला आणि दोन मजल्‍याच्‍या बांधकामाला अनुमती असतांना ७ मजल्‍यांचा बनावट बांधकाम नकाशा सिद्ध करून, तो महापालिकेने संमत केल्‍याचे भासवून त्‍यावर २४ कोटींचे कर्ज घेतले आहे. या प्रकरणी बांधकाम व्‍यावसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली. त्‍यावरून अशोक थेपडे आणि अमित थेपडे यांच्‍या विरोधात बनावट कागदपत्र सिद्ध करणे, करारनामाचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. तर अमित थेपडे यांना पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.

हा प्रकार वर्ष २००६ ते २०२३ या कालावधीत घडला. अगरवाल यांच्‍या वाट्यातील ४ कोटी रुपये किमतीचे दुकान आणि साडेदहा कोटी रुपये मूल्‍य असलेले कार्यालय थेपडे यांनी परस्‍पर विकले. त्‍यामुळे अगरवाल यांनी १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीष तुले पुढील अन्‍वेषण करत आहेत.