बेळगाव – बेळगावची भूमी तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. येथे वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांसारख्या पराक्रमी व्यक्तींनी जन्म घेतला आहे. देशाचे स्वातंत्र्य आणि उत्कर्ष यांत बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यात बेळगावचे योगदान अतुलनीय आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावचे वैशिष्ट्य नमूद केले. येडीयुराप्पा रस्त्यावरील मालिनी सीटी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे ‘किसान सन्मान योजने’अंतर्गत लाभार्थी शेतकर्यांना तेराव्या टप्प्याचे १६ सहस्र कोटी रुपयांचे अनुदान वितरण करण्यात आले, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘बेळगाव हायटेक रेल्वे स्थानका’चे उद़्घाटन करण्यात आले.
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘देशात सध्या ‘स्टार्टर’ची पुष्कळ चर्चा होत असली, तरी १०० वर्षांपूर्वी बेळगावमध्ये या ‘स्टार्टअप’चा प्रारंभ झाला होता. त्याचा प्रारंभ बाबूराव पुसाळकर या उद्योजकांनी स्वत:च्या एका लहान युनिटच्या माध्यमातून केली होती. तेव्हापासून बेळगाव हे अनेक उद्योगधंद्यांचे केंद्र बनले आहे. येत्या काळात हे केंद्र अधिक सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नव्या विकास योजना आणि प्रकल्प यांना चालना देण्यात येत असल्याने बेळगावच्या विकासालाही गती येणार आहे.’’