पुणे – बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराची जागा आपल्या खासगी मालकीची असल्याचा दावा संतोष पटवा यांनी केला आहे; मात्र मंदिर देवस्थानाच्या विश्वस्तांच्या मते पटवा यांची जागा मंदिराच्या शेजारी आहे. सरकारी नोंदीमध्येही मंदिर आणि भोवतालची ७ एकर जागा सरकारी मालकीची असल्याची नोंद आहे. मग संतोष पटवा कुणाच्या पाठबळावर भीमाशंकर मंदिरावर दावा करत आहेत, यामागे कुणी शक्तीशाली नेता आहे का ? मंदिर देवस्थान आणि पटवा यांच्यातील जागेचा वाद न्यायालयात चालू असतांनाच पटवा यांनी थेट मंदिराच्या जागेवरच दावा का केला असावा ? हा दावा करून शासनाकडून आपली ३६ एकर जागा अधिग्रहित केली जावी, असा पटवा यांचा उद्देश आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मंदिर देवस्थानकडून याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
भीमाशंकराचे मंदिर ज्या ठिकाणी आहे, त्याच्या भोवताली येथील पुजार्यांची लहान- लहान घरे आहेत. भूमापन अधिकार्यांनी सिद्ध केलेल्या नकाशात हे मंदिर आणि पुजार्यांची घरे स्पष्टपणे सरकारी जागेवर असल्याचे दर्शवण्यात आले आहे. हा सगळा परिसर शेकरू या प्राण्यामुळे संरक्षित वनामधे मोडत असल्याने इथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. मग थेट मंदिरावरच दावा करून शासनाकडून पैसै लाटण्याचा पटवा यांचा प्रयत्न यातून दिसून येत आहे. ७ एकर जागेसमवेतच पटवा यांच्या कह्यातील ३६ एकर जागाही पुन्हा मंदिर देवस्थानच्या कह्यात घेण्याचा देवस्थानचा न्यायालयीन प्रयत्न चालू आहे.
काय आहे प्रकरण ?
मंदिर देवस्थान आणि पटवा यांच्यातील जागेचा वाद जुना आहे. मंदिराच्या भोवतालची ३६ एकर जागा आधी सुखदेव कोडीलकर या पुजार्याच्या मालकीची होती; मात्र हे पुजारी आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी पैशांसाठी ती गहाण ठेवली. ही संधी साधून पटवा यांनी मंदिराच्या भोवतालची ३६ एकर जागा विकत घेतली. आता शेजारच्या ३६ एकर जागेसमवेतच मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे ती जागाही आपलीच असल्याचा दावा पटवा करत आहेत.