‘आपल्या चित्तावर योग्य संस्कार करून आपली व्यष्टी आणि समष्टी साधना चैतन्याच्या स्तरावर चालू करणारा चैतन्याचा झरा, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ! ही प्रक्रिया राबवल्यावर स्वभावदोष आणि अहं यांचे अभेद्य खडक फोडून सद़्गुण अन् चैतन्य यांचे झरे पाझरू लागतात आणि आनंद सोहळ्याला प्रारंभ होतो !
प्रारंभी ‘आपण केलेल्या आणि करत असलेल्या कृती योग्यच आहेत’, हे आपण स्वतःच ठरवलेले असते. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाल्यावर प्रथमच ‘त्या कृती आणि त्यामागची विचारप्रक्रिया कशी वरवरची (अयोग्य) आहे ?’, हे आपल्या लक्षात येते. आपण केलेली प्रत्येक कृती आणि त्यामागची विचारप्रक्रिया ईश्वराला अपेक्षित होण्यासाठी प्रतिदिन व्यष्टी साधनेचे आढावे होतात आणि आपला आनंदाच्या मार्गावरील प्रवास चालू होतो. देवाच्या कृपेने उमगलेले त्यातील टप्पे कृतज्ञतापुष्पाच्या माध्यमातून मी त्याच्याच चरणी अर्पण करत आहे.
मागील भागात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केल्यावर लक्षात आलेले टप्पे पाहिले. आता या भागात ‘माझ्याकडून झालेल्या चुका, त्यामागील माझी चुकीची विचारप्रक्रिया आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आढावासेविका सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांनी त्यावर दिलेले दृष्टीकोन’ पाहूया. (भाग २)
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/655616.html
२. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांनी दिलेले दृष्टीकोन !
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत होणार्या आढाव्यामध्ये ‘मी अन् इतरांनी माझ्या सांगितलेल्या चुका, त्यामागचे लक्षात आलेले माझे स्वभावदोष, माझी अयोग्य विचारप्रक्रिया आणि त्याविषयी आढावासेविका सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी दिलेले दृष्टीकोन’ पुढे दिले आहेत.
२ अ. चूक : मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केल्यानंतर तिसर्या दिवशी माझा व्यष्टी साधनेचा पहिला आढावा झाला. तेव्हा मी सांगितले, ‘‘मी ३ दिवस स्वभावदोष-निर्मूलन सारणी आणि दैनंदिनी लिहिली; पण चिंतनसारणी लिहिली नाही. त्या वेळी मी ‘अजून मला चिंतनसारणी नीट कळली नाही. मी शिकत आहे’, असे स्पष्टीकरणही दिले. ही चूक आढावा चालू असतांना माझ्या लक्षात आली.
२ अ १. स्वभावदोष : सवलत घेणे, विचारण्याची वृत्ती नसणे आणि अल्पसंतुष्टता असणे.
२ अ २. माझी अयोग्य विचारप्रक्रिया
अ. मला प्रक्रियेसाठी करायला सांगितलेल्या सूत्रांपैकी मी चिंतनसारणी सोडून सर्व केले आहे.
आ. मी चिंतनसारणी हळूहळू शिकून घेणार आहे.
इ. जे मला नीट येत नाही, ते चुकीचे लिहिण्यापेक्षा ‘इतर काय सांगतात ?’, ते ऐकून लिहूया.
ई. ‘आपण येथे शिकण्यासाठी आलो आहोत’, असा विचार मनात येऊन ‘ही चूक आहे’, असे मला वाटले नाही.
उ. मला अनेक सूत्रे येत आहेत; थोडेच शिकायचे आहे.
२ अ ३. सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांनी दिलेले योग्य दृष्टीकोन
२ अ ३ अ. विचारून न घेणे : ‘चिंतनसारणी कशी लिहायची ?’,ही तुमची अडचण आहे. त्यामागे ‘विचारून न घेणे’, हे तुमच्यातील तीव्र अहंचे लक्षण आहे. चिंतनसारणी न लिहून तुम्ही ३ दिवस वाया घालवलेत. ते परत येणार आहेत का ?
२ अ ३ आ. अल्पसंतुष्टता : ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणीचे लिखाण केले’, ही तीव्र अल्पसंतुष्टता आहे.
२ अ ३ आ १. साधनेविषयी अल्पसंतुष्टता असल्यामुळे साधनेची गती मंदावणे, साधकाचे अंतिम ध्येय ईश्वरप्राप्ती असणे; पण अल्पसंतुष्टतेमुळे काहीच प्रयत्न न होणे : सुप्रियाताईंनी मला विचारले, ‘‘साधनेत अडचणी आहेत’, असा विचार कधी झाला का ?’’ त्यावर मी ‘नाही’, असे उत्तर दिले. मी पुणे येथे सेवा करत असतांना एकदा तेथे सद़्गुरु स्वाती खाडये आल्या होत्या. तेव्हाही त्यांनी मला माझ्या साधनेतील अडचणी विचारल्यावर मी ‘मला काही अडचणी नाहीत’, असे सांगितले होते.
याविषयी सौ. सुप्रियाताई म्हणाल्या, ‘‘केवढी ही अल्पसंतुष्टता ! अडचणी असूनही त्या विचारायच्या नाहीत, इतरांचे साहाय्य घ्यायचे नाही आणि स्वतःच्या मतावर ठाम रहायचे. त्यामुळे तुमची क्षमता असूनही तुमच्या साधनेची गती मंदावली आहे. आपल्याला अडचणी नाहीत, म्हणजे आपण थांबलो आहोत. थांबून राहिलो, तर अधोगतीकडे जाणार ! ससा आणि कासव यांची गोष्ट ठाऊक आहे ना ! त्या गोष्टीतील सशाप्रमाणे तुम्ही साधनेच्या एका टप्प्यावर येऊन थांबला आहात, सुखावला आहात. तुमच्यात जिज्ञासा नाही.
साधकाचे अंतिम ध्येय ईश्वरप्राप्ती आहे. त्यासाठी प्रयत्न होत आहेत का ? ‘मला काही अडचणी नाहीत. मला काही विचारायचे नाही. ‘स्वतःला अधिक कळते’, असे वाटणे’, ही धोक्याची घंटा आहे. ‘आपली साधना व्हावी’, अशी आपल्यापेक्षा देवाची तळमळ अधिक आहे. देवाने दिलेली ही शेवटची संधी आहे. साधनेचे प्रयत्न तळमळीने, अंतर्मनापासून आणि देवाला अपेक्षित, असेच व्हायला हवेत.’’
२ आ. चूक : एकदा मी भोजनकक्षात बसून चहा घेत होते. तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या साधिकेने मला विचारले, ‘‘काकू, अल्पाहार करणार नाही का ?’’ त्यावर मी ‘नाही’, असे सांगितले. मी तिला ‘माझे अल्पाहार न घेण्याचे प्रायश्चित्त आहे’, हे खरे कारण सांगितले नाही.
२ आ १. स्वभावदोष : स्पष्टवक्तेपणाचा अभाव, मनमोकळेपणाचा अभाव आणि प्रतिमा जपणे (‘प्रतिमा जपणे’, हा अहंचा पैलू आहे’, याची जाणीव मला आढाव्यात झाली.)
२ आ २. माझी अयोग्य विचारप्रक्रिया
अ. ‘त्यात काय सांगायचे ? ‘मी प्रायश्चित्त घेतले आहे’, असे सांगणे, हे अहंचे लक्षण आहे’, असे मला वाटले.
अ १. सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले दृष्टीकोन
अ. या प्रसंगात देवाने तुमच्या अहं-निर्मूलनासाठी कुणाला तरी माध्यम बनवलेे होते; पण तुम्हाला ‘माझ्या अमुक चुकीसाठी मी प्रायश्चित्त घेतले आहे’, हे तीव्र अहंमुळे सांगता आले नाही. देवाने दिलेली अहं-निर्मूलनाची संधी तुम्ही घालवली.
आ. मला ‘माझी चूक आहे’, हे कळत होते; पण ‘नेमकी चूक काय आहे ?’, हे कळत नव्हते आणि ‘पुष्कळ गंभीर चूक आहे’, असेही मला वाटत नव्हते.
आ १. सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले दृष्टीकोन
स्वतःतील तीव्र अहंमुळे आपण ईश्वराचे साहाय्य घेऊ शकत नाही. या प्रसंगातून तुमच्यात ‘शिकण्याची स्थिती नसणे आणि स्वतःला पालटण्याची तळमळ नसणे’, हे स्वभावदोष अन् अहं यांचे पैलू लक्षात येतात.
अ. देवाला ‘आपल्या साधनेची स्थिती काय आहे ?’, ते कळते. आपण देवापासून काही लपवू शकत नाही; पण तीव्र अहंमुळे आपले चिंतन होत नाही.
आ. ससा आणि कासव यांच्या गोष्टीप्रमाणे आपण साधनेत थांबलो, तर आपल्या अधोगतीला आरंभ होतो. आपण एखाद्या गावाला जात असतांना आपण प्रवास करत असलेली गाडी बंद पडली, तर आपण इच्छित स्थळी जाण्याचे थांबतो का ? आपण त्या अडचणीवर उपाय शोधतो. ‘पुढचा प्रवास कसा करायचा ?’, हेे कुणाला तरी विचारतो. नियोजित ठिकाणी जाण्यासाठी इतरांचे साहाय्य घेतो; कारण आपली इच्छित स्थळी जाण्याची इच्छा आणि तळमळ असते. त्याप्रमाणे आपल्याला ईश्वरप्राप्तीची खरंच इच्छा आणि तळमळ आहे का ? आपले ध्येय काय आहे ? आपल्याला ध्येयाचा ध्यास आहे का ? त्यासाठी आपले पराकाष्ठेने प्रयत्न होतात का ?
इ. देवाने आपल्याला साहाय्य करण्यात कुठलीही उणीव ठेवलेली नाही. देवाने आपल्यासाठी किती करायचे ? आपण आता कृतीच्या स्तरावर कठोर प्रयत्न करायला हवेत. आपली साधना ईश्वरनिष्ठ असायला हवी.
ई. आपण स्वतःचा आढावा स्वतः घेऊन स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. ‘साधनेत कृतीला ९८ टक्केे महत्त्व आहे’, याची जाणीव असायला हवी, तरच आपले प्रयत्न अंतर्मनापासून होतील.
३. भावविश्वात घेऊन जाणारा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत असलेला भाववृद्धी सत्संग !’
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत आढावा अन् भाववृद्धी सत्संग असतो. ‘प्रत्यक्ष कृती करवून घेऊन साधना शिकवणारा आणि चित्तावर साधनेचा संस्कार करणारा प्रायोगिक भाग म्हणजे भाववृद्धी सत्संग ! तो आपल्याला भावविश्वात घेऊन जातो. ‘भावाच्या स्थितीत सतत कसे रहायचे ? आनंद कसा मिळवायचा ? मनातील प्रश्न आणि ताणाचे प्रसंग ईश्वराशी बोलून त्यांची उत्तरे कशी मिळवायची ? ईश्वराच्या अनुसंधानात अखंड कसे रहायचे ?’, हे शिकवून आपल्याला ईश्वराशी जोडणारा विहंगम मार्ग म्हणजे भाववृद्धी सत्संग !
सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला शिकवणारी ही प्रक्रिया अतिशय आनंददायी आहे. ही प्रक्रिया करवून घेतल्याबद्दल आणि त्याविषयी लिहून घेतल्याबद्दल मी ईश्वराच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (समाप्त)
– सौ. अनुराधा हरिश्चंद्र निकम, फोंडा, गोवा. (३०.५.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |