‘आपल्या चित्तावर योग्य संस्कार करून आपली व्यष्टी आणि समष्टी साधना चैतन्याच्या स्तरावर चालू करणारा चैतन्याचा झरा, म्हणजे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ! ही प्रक्रिया राबवल्यावर स्वभावदोष आणि अहं यांचे अभेद्य खडक फोडून सद़्गुण अन् चैतन्य यांचे झरे पाझरू लागतात अन् आनंद सोहळ्याला प्रारंभ होतो !
प्रारंभी ‘आपण केलेल्या आणि करत असलेल्या कृती योग्यच आहेत’, हे आपण स्वतःच ठरवलेले असते. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाल्यावर प्रथमच ‘त्या कृती आणि त्यामागची विचारप्रक्रिया कशी वरवरची (अयोग्य) आहे ?’, हे आपल्या लक्षात येते. आपण केलेली प्रत्येक कृती आणि त्यामागची विचारप्रक्रिया ईश्वराला अपेक्षित अशी होण्यासाठी प्रतिदिन व्यष्टी साधनेचे आढावे होतात अन् आपला आनंदाच्या मार्गावरील प्रवास चालू होतो. देवाच्या कृपेने उमगलेले त्यातील टप्पे कृतज्ञतापुष्पाच्या माध्यमातून मी त्याच्याच चरणी अर्पण करत आहे.
भाग १
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केल्यावर लक्षात आलेले टप्पे
१ अ. आरंभी चुका लक्षात न येणे आणि चुका लक्षात आल्यावर त्यासाठी परिस्थिती किंवा इतर यांना उत्तरदायी ठरवणे
१. आरंभी आपल्याला स्वतःकडून झालेल्या चुकाच लक्षात येत नाहीत.
२. चुका लक्षात येण्यास आरंभ झाल्यानंतरही त्यासाठी ‘परिस्थिती किंवा इतर व्यक्ती उत्तरदायी आहेत’, असे आपल्याकडून सांगितले जाते.
३. आपण आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी स्वतःच्या विचारप्रक्रियेवर ठाम असल्याचे लक्षात येते.
१ आ. अंतर्मनाचे चिंतन आणि मनाचा संघर्ष
१. काही आढाव्यांनंतर आपल्या मनाचा बहिर्मुखतेकडून अंतर्मनाकडे चिंतनाचा प्रवास चालू होऊन कृती आणि विचार यांचे अंतर्मनात चिंतन चालू होते.
२. आपल्यामध्ये ऐकण्याची वृत्ती निर्माण होऊ लागते; मात्र स्वीकारण्याच्या स्थितीकडे जातांना आपल्या मनाचा प्रचंड संघर्ष चालू होतो.
१ इ. चुकांची खंत वाटून प्रार्थना होणे : त्यानंतर आपण स्वतःच करून घेतलेल्या स्वतःच्या स्थितीविषयी आपल्याला तीव्र खंत वाटू लागते आणि अश्रूंना वाट मोकळी होते.
१ इ १. देवाला आर्ततेने होत असलेल्या प्रार्थना !
अ. ‘देवा, ‘तुझ्यापासून दूर नेणारे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ?’, ते तूच बघ.
आ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न होण्यासाठी माझी तळमळ वाढव अन् माझ्याकडून तुला अपेक्षित अशी कृती होऊ दे.
इ. देवा, माझे तन, मन, धन, चित्त, बुद्धी, अहं आणि प्राण चैतन्याने युक्त करून तूच ते तुझ्या चरणी अर्पण करून घे.
ई. ‘माझा श्वास आणि उच्छ्वास तूच आहेस’, याची मला सतत जाणीव राहू दे.
उ. मी तुझीच असतांना मी ‘माझे मन, माझी बुद्धी, माझे हे, माझे ते’, असे म्हटले’, यासाठी तू मला क्षमा कर. ‘अनंत कोटी ब्रह्मांडे तुझी आहेत. त्यांतील मीही तुझी आहे’, याचे भान मला सदैव राहू दे.’
१ ई. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया खर्या अर्थाने चालू होऊन आनंद अनुभवणे
१. व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये प्रसंग प्रांजळपणे मांडायला आरंभ होतो.
२. एकेका प्रसंगात आपल्याला आपल्या स्वभावदोषांचे अनेक पैलू कळू लागतात.
३. आपल्यात ‘मला पालटायचे आहे’, अशी तीव्र इच्छा निर्माण होते आणि आपले प्रयत्न अंतर्मनापासून होऊन प्रक्रियेला गती येते.
४. पूर्वी केवळ आढाव्यामध्ये सांगण्यासाठी करत असलेले प्रयत्न आता ‘मला देवाला समर्पित व्हायचे आहे’, या भावाने होऊ लागतात आणि आपल्या भाववृद्धीच्या प्रयत्नांना गती येते.
५. ‘समष्टीत स्वतःच्या चुका सांगणे आणि विचारणे; क्षमायाचना करणे, फलकावर चुका लिहिणे, त्यांवर प्रायश्चित्त घेणे अन् मनाचा आढावा घेणे’, यांत सातत्य राहू लागते.
६. आपण ‘प्रायश्चित्त न घेतल्याचे प्रायश्चित्त आणि चूक केल्याचे प्रायश्चित्त’, असे दुहेरी प्रायश्चित्त घ्यायला शिकतो.
७. ‘प्रायश्चित्त घेतांना आपले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न होतात का ?’, हे आपल्याकडून पाहिले जाते.
८. आपल्या मनातील ‘ध्येयाची जाणीव, तळमळ, खंत वाटणे’, यांत वाढ होते. त्यामुळे आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे प्रयत्न सतत शिकण्याच्या स्थितीत राहून करायला शिकतो आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष कृती करतांना तिला भावाची जोड देऊ लागतो.
९. त्यानंतर आपण देवाला अपेक्षित असे, ‘परप्रकाशातून स्वयंप्रकाशाकडे’ जाण्याचा आनंद अनुभवतो.’ (क्रमशः)
– सौ. अनुराधा हरिश्चंद्र निकम, फोंडा, गोवा. (३०.५.२०१९)
|