(स्पाय बलून म्हणजे हेरगिरी करणारा फुगा. हेरगिरी करून दुसर्या देशातील महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी असे अद्ययावत यंत्रणा असलेले फुगे पाठवले जातात.)
रशिया-युक्रेन युद्धानंतर, म्हणजेच कोरोना महामारीनंतरच्या काळात आकाराला आलेल्या नव्या विश्वरचनेचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाकडे पाहिले जात आहे. या संघर्षाला वेगवेगळ्या प्रकारचे आयाम प्राप्त होत आहेत. हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतांना दिसून येत आहे. किंबहुना ‘रशिया-युक्रेन युद्धाचा लाभ नेमका कुणाला झाला ?’, असा प्रश्न अनेक अभ्यासकांना विचारला जातो. तेव्हा त्याचे एक उत्तर समोर येते, ते म्हणजे चीन; कारण या युद्धामध्ये अमेरिकेची प्रचंड आर्थिक शक्ती वापरली जात आहे. दुसरीकडे रशिया आर्थिकदृष्ट्या क्षीण होतांना दिसत आहे. तसेच रशियासाठी अनेक देशांची दारे बंद झाल्यामुळे चीनकडे रशियाचा ओढा वाढला आहे. तेल आणि नैसर्गिक वायू यांचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे युरोपीय देशांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्वांचे आर्थिक विकासदर घसरणीला लागले आहेत; मात्र चीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे; कारण या युद्धकाळातील विस्कळीत अर्थव्यवहारांमुळे, अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे आणि अन्य काही घटकांमुळे चीनसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. त्यातून आर्थिक क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत चालला आहे. दुसरीकडे लष्करीदृष्ट्याही चीनचा विस्तार चालू असून त्यातून चिनी आक्रमकता वाढतांना दिसत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
१. चीनच्या वाढत्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी अमेरिकेने आखलेल्या धोरणांचा चीनवर फारसा परिणाम नाही !
वास्तविक पहाता अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष यापूर्वीच्या काळात आर्थिक अन् व्यापारी स्वरूपाचा होता. अमेरिकेच्या आर्थिक आणि व्यापारी हितसंंबंधांना आशिया खंडामध्ये खर्या अर्थाने चीनकडून अडथळा निर्माण करण्यात आला. त्यातून अमेरिकेला मोठा आर्थिक फटकाही बसला. त्या दृष्टीने अमेरिकेने चीनच्या या आव्हानाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा चीनच्या वाढत्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी काही धोरणे आखली होती. यातील पहिले धोरण म्हणजे चीनचे जगाशी एकीकरण करणे. त्यातून चीनची आक्रमकता अल्प होईल, अशी अमेरिकेची धारणा होती. दुसरे म्हणजे चीनशी आर्थिक संंबंध अत्यंत घनिष्ठ करणे. बिल क्लिंटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्यापासून ही धोरणे चालत आलेली होती. बराक ओबामा (माजी राष्ट्राध्यक्ष) यांनी त्याला अधिक महत्त्व देत या भूमिकेचा विस्तार केला. त्यातून अमेरिकेची चीनमधील आणि चीनची अमेरिकेतील गुंतवणुकींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. दोन्ही देशांतील व्यापार ७०० अब्ज डॉलर्सपर्यंत (५७ सहस्र ९३५ कोटी रुपयांपर्यंत) पोचला. हे घडत असतांना दुसर्या बाजूला ‘डेटा डिप्लोमसी’ (आंतरराष्ट्रीय स्तरावर माहितीची देवाणघेवाण, त्याचा वापर आणि संग्रह करणे यांसाठी परस्पर संवाद करण्यासंबंधीचे धोरण) आणि ‘वन बेल्ट वन रोड’ (आशिया, आफ्रिका आणि युरोप यांना चीनला जोडण्यासाठीची योजना) या चीनच्या दोन मोठ्या योजनांमुळे अमेरिकेचे धाबे चांगलेच दणाणले; कारण या दोन्हींमुळे अनेक छोट्या-मोठ्या देशांवरील चीनचा प्रभाव कमालीचा वाढू शकतो, याची अमेरिकेला कल्पना होती. त्यामुळेच यामध्ये सहभागी होऊ नये, यासाठी अमेरिकेने विविध देशांवर दबाव आणला. असे असूनही १०० हून अधिक देश ‘वन बेल्ट वन रोड’मध्ये सहभागी झाले. १०० हून अधिक देशांनी चीनकडून कर्जे घेतली आहेत. यावरून ‘चीनशी फारकत घेऊन रहा. चीनशी संबंध वाढवू नका’, याबाबत आणल्या जात असलेल्या अमेरिकेच्या दबावाचा फारसा परिणाम होतांना दिसत नाही. आता मात्र या संघर्षाला एक वेगळे वळण लागतांना दिसत आहे.
२. अमेरिकेतील अतीसंवेदनशील शहरांमध्ये हेरगिरी करणारे चीनचे फुगे (स्पाय बलून) !
अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात जसे प्रकार घडत होते, तसेच प्रकार आता या दोन देशांच्या संघर्षात घडतांना दिसत आहेत. खर्या अर्थाने या दोन देशांमध्ये शीतयुद्ध चालू होते कि काय ? अशी सध्याची परिस्थिती आहे. याचे एक उत्तम उदाहरण अलीकडच्या काळात घडले आहे. चीनचा एक हेरगिरी करणारा बलून (स्पाय बलून (फुगा)) अमेरिकेत फिरतांना आढळून आला. हा बलून पाडण्यात अमेरिकेला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील माँटाना या राज्यामध्ये ४० सहस्र फूट उंचीवर पांढर्या रंगाचा एक बलून (फुगा) फिरतांना काही लोकांना दिसून आला. या बलूनवर कॅमेरे (छायाचित्रक) आणि अन्य काही यंत्रणा बसवण्यात आल्या होत्या. साहजिकच या बलूनवरून अमेरिकेत अत्यंत तीव्र पडसाद उमटले; परंतु तरीही हा बलून उद़्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने २ ते ३ दिवसांचा कालावधी घेतला आणि नंतर तो पाडण्यात आला. हा ‘स्पाय बलून’ चीनचा होता, असे समोर आले आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे चीनने हे आरोप फेटाळले आणि तो बलून हवामान पालटांचा अभ्यास करण्यासाठी अन् नागरी कारणांसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले; परंतु यावर कुणाचाही विश्वास बसणे शक्य नाही.
मुळात इतक्या मोठ्या अमेरिकेमध्ये हा बलून माँटाना भागातच का आला ? हे जाणून घेणे आवश्यक आहे. अमेरिकेमध्ये ३ महत्त्वाची आण्विक केंद्रे असून त्या ठिकाणी अमेरिकेने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे ठेवलेली असण्याची शक्यता आहे. माँटाना हे यापैकी एक आहे. अशा अतीसंवेदनशील आणि अतीमहत्त्वाच्या ठिकाणावर चीनचा हा स्पाय बलून टेहळणी करतांना आढळून आला. साहजिकच अमेरिकेच्या संरक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आहे. ‘अशा प्रकारची टेहळणी करण्यासाठी चीनने बलूनच का पाठवला ?’, असाही प्रश्न विचारला जातो. उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीवरील बहुसंख्य भूभागांविषयीची सर्व माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध होत असतात; परंतु बलूनचा लाभ असा असतो की, तो उपग्रहांच्या तुलनेत अल्प खर्चिक असतो. तसेच पृथ्वीपासून तो अल्प उंचीवरून, म्हणजे सामान्यत: व्यावसायिक विमाने ज्या उंचीवरून प्रवास करतात, तेथून तो टेहळणी करू शकतो. यातील कॅमेर्यांद्वारे टिपण्यात येणारी छायाचित्रे अधिक ठळक आणि स्पष्ट असतात. त्यामुळे चीनकडून बलूनचा वापर केला गेला, तसेच तो पकडला गेला, तरी हात झटकून नामानिराळे होण्याचा मार्ग असतो. तसेच ‘तो (बलून) लष्करी हेतूने सोडण्यात आलेला नव्हता, तर हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सोडला होता’, असेही सांगता येऊ शकते. त्यामुळे चीनने अत्यंत सुनियोजित पद्धतीने बलूनच्या माध्यमातून हेरगिरीचा पर्याय निवडला.
३. शीतयुद्धाच्या काळापासून ‘स्पाय बलून’चा वापर होत असल्याच्या नोंदी !
टेहळणी करण्यासाठी आणि गुप्त माहिती फोडण्यासाठी बलूनचा वापर काही पहिल्यांदाच करण्यात आलेला नाही. इतिहासात डोकावल्यास, शत्रूची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी शेकडो वेळा अशा प्रकारचे बलून्स वापरण्यात आले आहेत. विशेषत: शीतयुद्धाच्या आणि दुसर्या महायुद्धाच्या काळात तर ‘स्पाय बलून’ हे युद्धाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जात होते. इंग्लंड आणि अमेरिका यांच्याकडून जर्मनीच्या हालचाली टिपण्यासाठी, तेथील रणगाड्यांची अन् युद्धसामुग्रीची पहाणी करण्यासाठी जर्मनीत अनेकदा अशा प्रकारचे बलून पाठवण्यात आले होते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने अनेकदा रशियाची गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी आणि रशियाने अमेरिकेच्या रणनीतीवर नजर ठेवण्यासाठी कित्येकदा स्पाय बलून वापरल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे चीनने अमेरिकेची टेहळणी करण्यासाठी अवलंबलेला हा मार्ग नवा नाही; पण शीतयुद्धोत्तर काळात त्याचा वापर फारसा झालेला नव्हता. आता चीनने हा मार्ग अवलंबल्यामुळे ‘हा शीतयुद्धाचा आरंभ आहे का ?’, असा प्रश्न विचारला जात आहे.
४. अमेरिकेला सर्वांत मोठा भूराजकीय धोका चीनकडून ! – अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांचे मत
मुळात ‘स्पाय बलून’चे हे प्रकरण दोन महत्त्वाच्या पार्श्वभूमींवर घडले आहे. अलीकडेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी जे. ब्लिंकन चीनच्या भेटीवर गेले होते. ‘चीन आणि अमेरिका यांनी भविष्यात एकत्र येऊन कशा पद्धतीने काम करावे ? दोघांमधील संबंध घनिष्ठ कसे करता येतील ?’ या दृष्टीने त्यांनी शी जिनपिंगसमवेत चर्चा केली होती. दुसरीकडे ‘सीआयए’ या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी ‘अमेरिकेला आजघडीला सर्वांत मोठा भूराजकीय धोका चीनकडून आहे. त्यामुळे भविष्यात अमेरिकेची सर्व रणनीती चीनला घेरण्यासाठी असेल’, असे वक्तव्य केले होते. अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकार्याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले. या दोन घटनांनंतर हे बलूनचे प्रकरण घडले आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यामधील संघर्ष एका नव्या उंचीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यात आणखी एक अत्यंत महत्त्वाचे पुढे येत आहे. ते म्हणजे अमेरिका हा संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून जगभरात ओळखला जातो. भारताचा संरक्षणावरील वर्षाचा खर्च साधारणत: ७० ते ७२ अब्ज डॉलर्स (५ सहस्र ७९३ कोटी रुपये) इतका आहे, तर अमेरिकेचा हा खर्च सुमारे ८०० अब्ज डॉलर्स (६६ सहस्र २१२ कोटी रुपये) इतका आहे. भारताच्या १० पटींनी अधिक खर्च करणार्या अमेरिकेने ९/११ चे (९ सप्टेंबर २००१ या दिवशी) आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी बर्याच सुधारणा केल्या आणि ‘नॅशनल होमलँड सिक्युरिटी अॅक्ट’ अन् ‘नॅशनल इंटेलिजन्स अॅक्ट’ बनवला. इतके सगळे असूनही एखाद्या राष्ट्राचा बलून अमेरिकेत प्रवेश करतो, त्यांच्या अतीसंवेदनशील ठिकाणापर्यंत पोचतो, तेथील नागरिकांच्या तो दृष्टीस पडतो; परंतु अमेरिकेचा गुप्तचर विभाग (इंटेलिजन्स ब्युरोला) आणि सुरक्षायंत्रणा यांना तो दिसत नाही, हे आश्चर्यजनक आहे. तसेच या बलूनवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यायला २-३ दिवस जातात, हे धक्कादायक आहे. या प्रकरणाने अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात मोठे प्रश्नचिन्ह उभे केलेे आहे.
५. भारताने सजग होण्याची आवश्यकता !
‘स्पाय बलून’ प्रकरणावरून भारताने सजग होण्याची आवश्यकता आहे; कारण चीन थेट अमेरिकेविरुद्ध अशा प्रकारच्या बलूनचा वापर यशस्वीपणे करत असेल, तर भारताशी संबंध तणावपूर्ण असतांना चीनकडून भारताविरुद्धही हा पर्याय अवलंबला जाऊ शकतो. त्यामुळे भारताने अत्यंत सजग रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानकडून आज ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून या माध्यमातून सीमेनजीकच्या राज्यांत शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ पाठवले जात आहेत. येणार्या काळात बलूनचा वापर होऊ शकतो. त्यामुळे ड्रोनला उद़्ध्वस्त करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे इस्रायलकडून एक अत्याधुनिक यंत्रणा विकत घेत आहोत, तशा प्रकारे आता बलूनभेदी यंत्रणाही भारताने सिद्ध ठेवणे आवश्यक आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र्र धोरण विश्लेषक
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, ११.२.२०२३)