भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कोंडागट्टू जिल्ह्यातील श्री अंजनेय स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे खासदार के. केशवराव म्हणाले, ‘‘आम्ही प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहोत.’’ दुसरीकडे तेलंगाणाच्या शेजारील आंध्रप्रदेश राज्याचे सरकार २६ जिल्ह्यांत तब्बल १ सहस्र ४०० मंदिरे बांधत आहेत. त्यांनी यापूर्वीच ही घोषणा केली आहे. यातून लक्षात येते की, या राज्यांमध्ये हिंदूंची मते मिळवण्यासाठी मंदिरांना प्राधान्य दिले जात आहे.
(हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भक्तांच्या हातात देण्यासाठी हिंदूंनी सतत मागणी करत रहाणे आवश्यक आहे. अन्यथा मंदिरांना पैसे देण्याच्या नावाखाली मंदिरांचा पैसा लुबाडण्यास सर्वपक्षीय सरकारे सिद्धच रहातील ! – संपादक)
१. आंध्रप्रदेश सरकार १ सहस्र ४०० मंदिरांपैकी १ सहस्र ३० बांधकामे स्वत:, तर ३३० ‘समरसथ सेवा फाऊंडेशन’ बांधत आहेत. विशेष म्हणजे हे फाऊंडेशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येक मंदिरासाठी ८ लाख रुपये, तर मूर्तीसाठी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तेलंगाणा सरकारने १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च करून यदागिरिगुट्टा श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
२. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर म्हणाले की, पूर्वी जे पक्ष चर्च वगैरेंना निधी द्यायचे ते आता देखाव्यासाठी मंदिरांविषयी बोलत आहेत. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले पक्ष भावनिक धोरण पुढे करत आहेत; मात्र त्यांचे वास्तव जनतेला ठाऊक आहे. भाजप विकासाच्या धोरणावर वाढत आहे.
संपादकीय भूमिकादेशात आता हिंदुत्वाचे वातावरण दिवसेंदिवस विस्तारत आहे, याचाच हा परिणाम आहे ! कालपर्यंत ख्रिस्ती आणि मुसलमान यांना खुश करण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी आता हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत, हेही नसे थोडके ! |