१. पोटाच्या व्याधींसाठी विविध औषधे घेतली, तरी त्रासांत वाढ होणे
‘जानेवारी २०२२ पासून मला पोटाचा त्रास (शौचास सतत होणे किंवा अजिबात न होणे) चालू झाला. आरंभी ‘पोट रिकामे झाल्यावर बरे वाटेल’, असे वाटून मी आश्रमाच्या चिकित्सालयाकडून अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी अशी सर्व औषधे घेतली, तरी त्रास न्यून न होता वाढतच गेला. त्यानंतर शौचास होण्याचे प्रमाण वाढले. जून-जुलै २०२२ मध्ये हे प्रमाण पुष्कळ वाढले.
२. पोटाच्या व्याधींसाठी विविध चाचण्या करणे
‘मला त्रास सहन होत नव्हता. शेवटी माझ्या भावाने मला मुंबईला प्रसिद्ध ‘गॅस्ट्रोलॉजिस्ट’ना (पोटाच्या विकारांच्या तज्ञांना) दाखवले. त्यांनी ‘एंडोस्कोपी’ (तोंडावाटे छायाचित्रक (कॅमेरा) असलेली नळी पोटात सोडून पोटाची पहाणी करणे), ‘पेटस्कॅन’ (शरिरातील पेशींचे कार्य जाणून घेण्यासाठी केलेली एक चाचणी) करून पडताळून आलेली निरीक्षणे त्वरित पुढे एका मोठ्या रुग्णालयात दाखवायला सांगितली.
३. भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यावर तपासणीच्या वेळी अल्प त्रास होणे
तेथील आधुनिक वैद्यांनी मला मोठ्या आतड्याच्या एका भागाचा कर्करोग (Sigmoid Colon) झाल्याचे सांगितले. रोगाचे निदान ऐकून माझा भाऊ आणि वहिनी घाबरून गेले. मी मात्र ‘माझ्यावर उपचार करणारे, ‘एंडोस्कोपी’ करणारे आणि पेटस्कॅन करणारे आधुनिक वैद्य यांच्या माध्यमातून गुरुदेवच माझी तपासणी करत आहेत’, असा भाव ठेवल्याने मला अल्प त्रास झाला.
४. गुरुदेवांवरील (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धेमुळे शस्त्रक्रियेचा निर्णय ऐकल्यावर शांत आणि स्थिर रहाता येणे
वैद्यकीय अहवालानुसार माझ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. हे ऐकून मी शांत आणि स्थिर होते. त्या वेळी तपासणारे आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमच्याइतका स्थिर आणि आत्मविश्वास असणारा रुग्ण आम्ही कधी पाहिला नाही.
तुम्ही आम्हाला धीर दिलात.’’ त्या वेळी मी त्यांना म्हटले, ‘‘हे सर्व माझ्या गुरुदेवांच्या कृपेमुळे झाले. ते सतत माझ्या समवेत असतात. ‘तेच माझ्यावर उपचार करत आहेत’, असे मला वाटत आहे.’’
५. रुग्णालयात भरती होणे
५.९.२०२२ या दिवशी माझी शस्त्रक्रिया करायचे ठरले. त्याप्रमाणे ४.९.२०२२ या दिवशी मी रुग्णालयात भरती झाले.
६. गुरुदेवांच्या चैतन्यामुळे रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना रुग्ण साधिका वयाने लहान असल्याचे वाटणे
प्रवेशाच्या वेळी तेथील आधुनिक वैद्या मुलीने मला ‘‘रुग्ण कोण ?’’ असे विचारले. त्यांना ‘‘मी’’ असे सांगितले. ‘‘माझे वय वर्षे ७१’’, असे सांगितल्यावर तिला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, ‘‘तुमचे एवढे वय असेल, असे वाटत नाही. तुम्ही किती गोड दिसत आहात.’’ त्या वेळी ‘गुरुदेवांच्या चैतन्यामुळे तिला असे वाटले असावे’, असे मला वाटले.
७. रुग्ण साधिकेकडून रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना चांगला प्रतिसाद दिला गेल्याने आधुनिक वैद्यांचा उत्साह आणि बळ वाढल्याचे त्यांनी सांगणे
५.९.२०२२ या दिवशी शस्त्रक्रिया झाल्यावर ३ दिवसांनी मला उठून चालायला सांगितले. आधुनिक वैद्य ज्या वेळी तपासायला यायचे, त्या वेळी ते म्हणायचे, ‘‘आम्ही केलेल्या उपचारांना तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे आमचा उत्साह आणि बळ वाढले. त्यामुळे तुमच्यावर आम्ही उपचार करू शकलो.’’
८. उपचारार्थ रुग्णालयात असतांना साधिकेने केलेले भावाचे प्रयत्न
अ. ‘ज्या वेळी आधुनिक वैद्य उपचार करत असत, त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्यावर उपचार करत आहेत’, असे मला वाटत असे.
आ. ‘तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि अन्य संत माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवायचे.
इ. ‘मी रुग्णालयात नसून रामनाथी आश्रमात आहे’, असे अनुभवत होते.
ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई, पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार माझ्याशी बोलून मला धीर देत होत्या. त्या वेळी ‘मला चैतन्याचा स्रोत मिळत आहे’, असे वाटायचे.
९. शस्त्रकर्म झाल्यावर ७ दिवसांत पायर्या चढून पहिल्या माळ्यावर जाता येणे
११.९.२०२२ या दिवशी, म्हणजे शस्त्रकर्म झाल्यावर ७ व्या दिवशी मला रुग्णालयातून आश्रमात पाठवले. त्या वेळी ‘‘मी १ मजला चढू शकते का ?’’, असे आधुनिक वैद्यांना विचारल्यावर त्यांनी मला त्याची अनुमती दिली. मी आश्रमात आल्यावर पायर्या चढून खोलीत आले. हे पाहून सर्व साधकांनाही आश्चर्य वाटले.
१०. गुरुदेवांच्या चैतन्यामुळे शस्त्रकर्म झाल्यावर अल्प कालावधीतच सेवा करणे शक्य होणे
त्यानंतर मी प्रतिदिन २ – ३ वेळा खोलीतून आश्रमाच्या कार्यालयीन भागात चालत जात असे. त्या वेळी माझा चालण्याचा व्यायाम होत असे. माझे भ्रमणभाषवर संपर्क करणे आणि ‘ई मेल’ पाठवणे अशा सेवाही चालू झाल्या. हे सर्व गुरुदेवांच्या चैतन्यामुळे शक्य झाले आहे.
११. रुग्णालयात असतांना अन्य रुग्णाला साधना सांगणे आणि त्याचा त्याला लाभ होणे
११ अ. शेजारील रुग्णाला कुलदेवी आणि दत्ताचा नामजप करायला सांगणे : रुग्णालयात माझ्या शेजारील रुग्ण ‘रांची’ येथून आली होती. तिचीही शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ती सारखी मोठ्याने कण्हत होती. दुसर्या दिवशी मी तिला भेटले आणि सांगितले, ‘‘शस्त्रक्रिया झाल्यामुळे दुखणारच. आपण त्याकडे दुर्लक्ष करायला हवे. आपण देवाला प्रार्थना करून नामजप केल्याने दुखण्यावरचे लक्ष न्यून होईल. आपल्याला आपल्या प्रारब्धाचे भोग भोगावेच लागणार आहेत. नामजप केल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.’’ त्यांची कुलदेवी श्री दुर्गादेवी असल्याने मी तिला ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’, हा जप आणि पूर्वजांचा त्रास न्यून होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करायला सांगितला.
११ आ. रुग्णाने नामजप केल्यावर त्याच्या शारीरिक वेदना न्यून होऊन तो आनंदी होणे : त्या रुग्ण स्त्रीचा आय्.ए.एस्. शिकणारा मुलगा आणि त्याचा मित्र तिच्या समवेत होते. त्यांना ‘चैतन्यवाणी अॅप’ची ‘लिंक’ देऊन भ्रमणभाषवर नामजप लावायला सांगितला. त्याप्रमाणे त्याने भ्रमणभाषवर नामजप लावला.
त्यालाही जपाचे महत्त्व सांगितले. जपामुळे त्या रुग्ण स्त्रीचे रडणे – ओरडणे थांबले. दुसर्या दिवशी तिच्या चेहर्यातही पालट होऊन ती आनंदी झाली.
११ इ. पितृपक्षात श्राद्धविधी करायला सांगणे : तिला पितृपक्षात श्राद्धविधी करायला सांगितले. तेव्हा तिने ‘रांची’ येथील तिच्या सुनेला भ्रमणभाष करून पितरांना भोजन ठेवायला सांगितले आणि गाईला पानावर जेवण द्यायला सांगितले.
११ ई. ‘प्रत्येक ठिकाणी गुरुदेव सेवा आणि प्रसार करण्याची संधी देतात’, याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे : तिचा मुलगा पुष्कळच गुणी होता. तो आईची सेवा मनोभावे करत होता. मी त्याला एकदाही आईवर चिडलेले पाहिले नाही. समाजात असे कितीतरी लोक आहेत, ज्यांना धर्मशास्त्र ठाऊक नाही. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेला नामजप आणि कृती कळल्यावर त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हा ‘प्रत्येक ठिकाणी गुरुदेव सेवा आणि प्रसार करण्याची संधी देतात’, असे वाटले आणि याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
१२. ‘गुरुदेवांनी आश्रम म्हणजे एक आध्यात्मिक कुटुंबच निर्माण केले आहे’, याची अनुभूती येणे
रुग्णालयात असतांना मला साहाय्य करण्यासाठी आश्रमातून एका साधिकेचे (कु. वैशाली बांदीवडेकर) नियोजन केले होते. त्या साधिकेने माझी सेवा मनापासून केली. आश्रमातील अन्य एक साधक (श्री. निनाद गाडगीळ) यांनीही माझ्याविषयीच्या अन्य सेवा मनापासून केल्या. ‘स्वतःचा मुलगाही करू शकणार नाही’, इतक्या प्रेमाने त्याने माझी काळजी घेतली. ‘गुरुदेवांनी आश्रम म्हणजे एक आध्यात्मिक कुटुंबच निर्माण केले आहे’, याची अनुभूती मला आली.’
‘भगवान श्रीकृष्ण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती स्मिता सुबोध नवलकर (आध्यत्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |