चीनची ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध करण्‍याची सिद्धता आणि भारताची क्षमता !

(‘मल्‍टी डोमेन’ म्‍हणजे एकाच वेळी विविध पद्धतीने लढणे)

१. चीनची जगाच्‍या विरोधात ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध करण्‍याची सिद्धता !

‘अमेरिकेतील विविध तज्ञ आणि त्‍यांचे परराष्‍ट्र मंत्रालय यांनी काही अहवाल सिद्ध केले आहेत. त्‍यात असे म्‍हटले की, वर्ष २०२७ मध्‍ये चीन विविध युद्धनीतींचा वापर करून अमेरिका किंवा जगाच्‍या विरोधात युद्ध लढेल. याला ‘मल्‍टी डोमेन वॉरफेअर’ असेही म्‍हटले जाऊ शकते, म्‍हणजे पारंपरिक युद्धात दोन्‍ही बाजूंची सैन्‍यदले एकमेकांशी लढतात. याखेरीज चीन विविध अपारंपरिक पद्धतीनेही जगाशी लढेल, तसेच तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत जगाचा पराभव करील. जी विविध युद्धे अन्‍य देशांशी होऊ शकतात, ती आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्‍स’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) यांच्‍या साहाय्‍याने ‘इलेक्‍ट्रॉनिक’  पद्धतीने होऊ शकतात, तसेच सायबर युद्ध, अंतराळातील युद्ध आणि मानसशास्‍त्रीय युद्धही होऊ शकते.

याविषयी चीनच्‍या कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या केंद्रीय समितीच्‍या अहवालात माहिती देण्‍यात आली आहे. सर्व प्रकारचे तंत्रज्ञान जगाच्‍या विरोधात वापरण्‍यासाठी चीन सैन्‍याला सिद्ध करत आहे. असेही म्‍हटले जाते की, यंत्रमानवाच्‍या (रोबोटच्‍या) माध्‍यमातून चीन अन्‍य देशांवर आक्रमण करील. यासाठी चीन त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या तंत्रज्ञान आस्‍थापनांना मोठ्या प्रमाणात ‘सबसिडी’ (अनुदान) देत आहे आणि त्‍यांना या विषयावर तंत्रज्ञान विकसित करायला सांगत आहे. याचा अर्थ चीन ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध करू शकतो आणि अमेरिका, तैवान यांच्‍यासह जगातील अन्‍य देश त्‍यांचा प्रतिकार करू शकत नाही. अशा प्रकारची माहिती अमेरिकेतील विविध तज्ञ जगासमोर आणत आहेत.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. भारत आणि अमेरिकेसह अन्‍य देशांकडून ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्‍स’चा वापर !

चीन ज्‍या पद्धती विकसित करत आहे, त्‍याच पद्धती अमेरिकेसह अन्‍य देशही विकसित करत आहेत. यात भारतही मागे नाही. तोही ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्‍स’चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. नुकताच भारताचा अर्थसंकल्‍प सादर झाला असून त्‍यात संरक्षणाचे प्रावधान (तरतूद) घोषित झाले होते. त्‍यात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्‍स’ हे येणार्‍या काळातील तंत्रज्ञान असून ते प्रत्‍येक विद्यापिठात शिकवले आणि विकसित केले जाईल’, असे म्‍हटले होते. त्‍याचा वापर भारताच्‍या प्रगतीसाठी करण्‍यात येईल. आवश्‍यकता पडल्‍यास त्‍याचा शस्‍त्रनिर्मितीसाठीही वापर केला जाईल.

सायबर आणि अंतराळ युद्ध यांसाठी अन्‍य देशही सिद्धता करत आहेत. असेही म्‍हटले जाते की, चीन अनेकदा अपप्रचाराद्वारे युद्ध करत असतो. त्‍याला त्‍याने केलेले काम मोठे करून दाखवण्‍याची सवय आहे. त्‍यातून सर्व जगाला घाबरवण्‍याची त्‍याची इच्‍छा असते. त्‍यामुळे भारत किंवा तैवान यांसारखे देश घाबरून जातील आणि चीन सांगेल ते त्‍यांना ऐकावे लागेल, असे त्‍याला वाटते.

३. ‘मल्‍टी डोमेन युद्धा’चा प्रतिकार करण्‍यासाठी भारत आणि अमेरिका यांची सिद्धता

अशा प्रकारे ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध झाले, तर त्‍याला प्रत्‍युतर देण्‍यासाठी भारत आणि अमेरिका सिद्ध आहेत का ? अमेरिका ही एक मोठी महाशक्‍ती आहे. त्‍यांची पारंपरिक शक्‍ती पुष्‍कळ आहे. तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्रातही अमेरिकेला ‘महाशक्‍ती’ समजले जाते. असे समजले जाते की, चीनने तैवानवर आक्रमण केले, तर अमेरिका त्‍याला नक्‍की साहाय्‍य करील.

अशा प्रकारचे आक्रमण चीनने भारतावर केले, तर भारताकडे स्‍वत:चे संरक्षण करण्‍याची क्षमता आहे का ? थोडक्‍यात सांगायचे झाले, तर चीनची अर्थव्‍यवस्‍था भारताच्‍या तिप्‍पट मोठी आहे. त्‍यामुळे त्‍यांना अशा प्रकारची युद्ध सज्‍जता करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्‍य मिळते; पण भारताकडे त्‍याची कमतरता आहे; कारण भारत संरक्षणाच्‍या प्रावधानच्‍या खेरीज अन्‍य सामाजिक उपक्रमांसाठी पुष्‍कळ अधिक आर्थिक व्‍यय करतो.

४. चीनचा प्रतिकार करण्‍यासाठी भारताला संरक्षणाच्‍या प्रावधानामध्‍ये वाढ करणे आवश्‍यक !

भारताला चीनच्‍या पुढे जायचे असेल, तर येणार्‍या काळात भारताला संरक्षण तरतुदीमध्‍ये प्रतिवर्षी २० ते ३० टक्‍के वाढ करावी लागेल. अशा प्रकारच्‍या युद्धासाठी पुष्‍कळ पैसा आणि वेळ व्‍यय करावा लागतो. त्‍याची सिद्धता १-२ वर्षांमध्‍ये होणे शक्‍य नसते. त्‍यासाठी प्रचंड कष्‍ट घ्‍यावे लागतात. कोरोना महामारीमुळे चीनची अर्थव्‍यवस्‍था खालावत आहे, तर भारताची अर्थव्‍यवस्‍था ही जगात सर्वांत वेगाने वाढणारी आहे. त्‍यामुळे येणार्‍या काळात भारताला संरक्षणाच्‍या तरतुदीसाठी अधिक पैसा मिळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍या माध्‍यमातून भारतालाही सर्व प्रकारच्‍या युद्धाची सिद्धता करता येईल. तसे प्रयत्न चालूही झालेले आहेत. केवळ या सिद्धतेसाठी पैसा अधिक लागत असल्‍याने भारतीय नागरिकांची त्‍याग करण्‍याची सिद्धता हवी. कर वाढल्‍यास तो स्‍वीकारावा लागेल. राजकीय पक्षांकडून होणारी ‘बंद’सारखी आंदोलने थांबायला हवीत. सर्व राजकीय पक्ष आणि भारतीय एकत्र आले अन् त्‍यांनी चिनी नागरिकांसारखे कष्‍ट घेऊन देशाचा आर्थिक विकास केला, तर भारताला संरक्षणाचे प्रावधान वाढवायला वेळ मिळेल आणि चीनच्‍या कुठल्‍याही प्रकारच्‍या युद्धाला प्रत्‍युत्तर देण्‍याची क्षमता वाढेल. त्‍यासाठी भारताने त्‍वरित संरक्षणाचे प्रावधान वाढवणे आवश्‍यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.