देशात पहिल्यांदाच सापडला ५९ लाख टन ‘लिथियम’चा साठा !

बॅटरी निर्मितीसाठी लागणारा महत्त्वाचा धातू !

नवी देहली – जम्मू आणि काश्मीरच्या रियासी भागामध्ये ५९ लाख टन ‘लिथियम’चा (‘नॉन-फेरस मेटल’ – अलोह धातू) साठा सापडला आहे. भारतात पहिल्यांदाच लिथियमचा साठा सापडला आहे. लिथियमचा वापर भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, इलेक्ट्रिक वाहने यांच्या बॅटरी आणि इतर उपकरणांच्या चार्ज करण्यायोग्य बॅटरी निर्मितीसाठी केला जातो. हा एक दुर्मिळ धातू आहे. यासाठी भारताला आतापर्यंत चीन आणि अन्य देश यांवर अवलंबून रहावे लागत होते; मात्र आता भारतातच हा साठा सापडल्याने अन्य देशांवरील अवलंबित्व अल्प होईल.

भारतात लिथियमचे उत्पादन फारच अल्प आहे. वर्ष २०२० मध्ये लिथियम आयातीच्या संदर्भात भारत जगात चौथ्या क्रमांकावर होता. भारत लिथियम बॅटरीपैकी ८० टक्के बॅटरी चीनमधून आयात करतो. या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांसारख्या लिथियम समृद्ध देशांमधील खाणींमध्ये हिस्सा विकत घेण्याच्या प्रकल्पांवर काम करत आहे.