भारतीय सैन्यात अग्नीविरांच्या भरतीसाठी ‘ऑनलाईन सीईई’सह नवीन भरती प्रणाली

अग्नीविरांच्या भरतीसाठी नवीन  प्रक्रिया

पणजी, ९ फेब्रुवारी (सप) – भारतीय सैन्यात अग्नीविरांच्या भरतीसाठी नवीन भरती प्रक्रिया दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे, असे ‘सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर’ यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षाच्या सैन्यातील अग्नीवीर प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (‘सीईई’साठी) १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२३ या कालावधीत अर्ज सादर करावा. उत्तर आणि दक्षिण गोवा या गोव्यातील २ जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांना हा अर्ज सादर करता येईल. अर्ज करतांना उमेदवाराला जिथे तो ‘ऑनलाईन सीईई’साठी बसू इच्छितो, अशी ५ परीक्षा केंद्रे निवडावी लागतील.

नवीन भरती प्रणालीनुसार ऑनलाईन नोंदणी चालू झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करतील. त्यानंतर ‘ऑनलाईन सीईई’ १२ एप्रिलपासून चालू होईल. दुसर्‍या टप्प्यात सीईईमध्ये निवडले गेलेले उमेदवार हे ‘फिजिकल फिटनेस टेस्ट’, ‘फिजिकल मेजरमेंट टेस्ट’ आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील.