‘बीबीसी’ वृत्तसंस्‍थेचा हिदु धर्म, संस्‍कृती आणि भारत द्रोह !

भारतभरात पत्रकारितेच्‍या नावावर देश आणि हिंदु धर्म द्रोही छुपे षड्‍यंत्र (अजेंडा) चालवणार्‍या अनेक वृत्तसंस्‍था अन् वृत्तवाहिन्‍या कार्यरत आहेत. बर्‍याच वृत्तसंस्‍था आणि वृत्तवाहिन्‍या यांची मालकी विदेशी व्‍यक्‍तींकडे आहे. यांपैकीच एक आहे ‘बीबीसी’ वृत्तसंस्‍था आणि वृत्तवाहिनी ! बीबीसीचे पूर्ण नाव ‘ब्रिटीश ब्रॉडकास्‍टिंग कॉर्पोरेशन.’ बीबीसी ही मूळची ‘ब्रिटीश पब्‍लिक सर्व्‍हिस ब्रॉडकास्‍टर’ म्‍हणून कार्यरत आहे. बीबीसीकडून सातत्‍याने भारतियांच्‍या मनात वर्तमान शासनाची विविध धोरणे, हिंदु धर्म, हिंदुत्‍व, हिंदु संस्‍कृती, तसेच राष्‍ट्र आणि धर्म रक्षणाचे निरपेक्षपणे कार्य करणार्‍या अनेक संस्‍था अन् व्‍यक्‍ती यांच्‍या विरोधात संभ्रम निर्माण होईल, असे लिखाण आणि वृत्ते प्रसारित केले जातात. यासंदर्भात बीबीसी संकेतस्‍थळाच्‍या केलेल्‍या अभ्‍यासावरून अशा वृत्तसंस्‍थेचे ध्‍येय काय आहे ? हे स्‍पष्‍ट होते.


बीबीसीकडे काही लेखक नक्षलवादाचा पुरस्‍कार करणारे, तसेच ‘जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालया’ (जे.एन्.यू.)सारख्‍या विद्यापिठांमधील तथाकथित अभ्‍यासक आहेत. हिंदु संस्‍कृती विरुद्धचे लिखाणही बीबीसी वेळोवेळी प्रकाशित करते. त्‍यात ‘समलैंगिकतेला प्रोत्‍साहन देणे, वासनांधता पसरवणे, काही विशिष्‍ट ‘डे’ (व्‍हॅलेंटाईन डे) प्रथांचा पुरस्‍कार करणे आणि त्‍यांना प्रोत्‍साहन देणे, महिलांना व्‍यसनाधीनतेकडे वळवणे, जातीयवादाला खतपाणी देणे इत्‍यादि. भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी यांनी भारतातील विदेशी प्रसिद्धीमाध्‍यमांवर बंदी घालण्‍याचे आवाहन वेळोवेळी करत आहेत. ते का ? याचे उत्तर या लेखातून काही प्रमाणात निश्‍चितच मिळेल.

१. शासन आणि तिच्‍या धोरणांच्‍या विरुद्ध प्रकाशित केलेल्‍या बातम्‍यांचे काही मथळे

श्री. रवींद्र बनसोड

अ. नरेंद्र मोदी सरकारच्‍या आर्थिक पॅकेजचा शेतकर्‍यांना लाभ होईल का?

या मथळ्‍यातील बातमीचा निष्‍कर्ष खाली दिला आहे की, जो नकारात्‍मक आहे. असे नकारात्‍मक निष्‍कर्ष कोण काढत आहे, तर ‘जे.एन्.यू.’चे प्राध्‍यापक प्रवीण झा ! त्‍यांनी म्‍हटले आहे, ‘या घोषणांमुळे शेतकर्‍यांना तात्‍काळ कुठलेच साहाय्‍य मिळणार नाही.’

आ. चिनी वस्‍तूंवर बहिष्‍कार टाकला, तर आपल्‍याला औषधे मिळतील ?

इ. दलित स्‍त्रिया इतरांच्‍या तुलनेत न्‍यून काळ का जगतात ?

ई. दलित आणि संघामधील दरी आता कशी भरून निघणार ?

उ. ‘आयुर्वेदातील बहुतेक औषधी या आजार होऊ नये किंवा व्‍यक्‍तीची प्रतिकारक्षमता वाढावी यांसाठी आहे. तसेच होमिओपॅथीची औषधे कोरोनावर उपाय नसून प्रतिकार क्षमता वाढवण्‍यासाठी आहेत’, हे सर्वश्रुत असूनही बीबीसी त्‍याविरुद्ध वृत्त प्रकाशित करते. अशा काही वृत्तांचे मथळे –

उ १. ‘आर्सेनिक आल्‍बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्‍या कोरोनापासून खरच बचाव करणार का ?

उ २. लसूण खाल्‍ल्‍याने कोरोना दूर जातो का ?

उ ३. गोमूत्र प्‍यायल्‍याने कोरोनापासून रक्षण होते का ?

उ ४. शाकाहाराचा लाभ होतो का ? (आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांची अ‍ॅलर्जी असलेली बीबीसी ! – संपादक)

ऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्‍थापन केलेला ‘पीएम केअर फंड’ याविषयीही लोकांमध्‍ये संभ्रम किंवा विकल्‍प निर्माण होईल, अशी ध्‍वनीचित्रफीत संकेतस्‍थळावर प्रसारित केली आहे.

ए. ‘शिवाजी महाराजांचे मुसलमान शिलेदार ठाऊक आहेत का ?’, या आशयाच्‍या मथळ्‍याखाली एक लेख प्रकाशित केला आहे. तथाकथित इतिहासकार राम पुनियानी यांनी हा लेख लिहिला आहे. २० फेब्रुवारी २०१८ या दिवशी प्रकाशित केलेल्‍या लेखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्‍लेख केलेला आहे. तसेच त्‍यांना धर्मनिरपेक्ष (सेक्‍युलर) ठरवण्‍याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या काळात एकही हिंदु राजा महाराष्‍ट्रात नव्‍हता, तरीही ‘शिवाजी औरंगजेबाविरुद्ध आणि स्‍थानिक हिंदु राजांविरुद्धही लढला’, असे लिहिले आहे.

ऐ. २१ फेब्रुवारी २०१८ या दिवशी डॉ. मेघा पानसरे यांनी ‘तुम्‍हाला लोकशाही हवी कि हिंदु पाकिस्‍तान ?’ या मथळ्‍याखाली लिहिला. लेखात संघ, सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर टिका केली आणि पुढे ‘भारत हवा कि हिंदु राष्‍ट्र ?’, असा प्रश्‍न वाचकांना विचारला आहे.

२. भारतात अशांतता पसरवण्‍याचा बीबीसीचा प्रयत्न

अ. अमेरिकेत वर्णद्वेषातून उसळलेल्‍या हिंसाचाराचेही विस्‍तृत लिखाण बीबीसीने संकेतस्‍थळावर प्रकाशित केले आहे. ‘दलितांनी कृष्‍णवर्णियांच्‍या चळवळीतून काय शिकायला हवे ?’, या लेखातून भारतातील जनमानसात द्वेष पसरवण्‍याचा प्रयत्न होत आहे, असे लक्षात येते.

आ. तमिळनाडूतील पोलीस कोठडीत जयराज आणि फेनिक्‍स या बापलेकांच्‍या मृत्‍यूच्‍या प्रकरणावरून बीबीसीने एक व्‍हिडीओ प्रसारित केला. त्‍याचा मुख्‍य मथळाच ‘अल्‍पसंख्‍यांकांवर पोलिसांचे अत्‍याचार ?’, असा आहे. त्‍यात ‘दळणवळण बंदीच्‍या काळात लोकांनी नियम पाळावे, यासाठी पोलिसांनी अनेकदा बळाचा वापर केला; पण हा वापर गरीब आणि अल्‍पसंख्‍यांक समाजावरच अधिक झाला’, असे म्‍हटले आहे. बीबीसीचा खास ‘रिपोर्ट’ (अहवाल) म्‍हणून हा व्‍हिडीओ प्रसारित केला आहे. ‘भारतात ख्रिस्‍ती समाज अल्‍पसंख्‍यांक म्‍हणून पोलीस कारवाई केली जाते. जॉर्ज फ्‍लाईड यांच्‍या मृत्‍यूनंतर अमेरिकेत जसा उद्रेक झाला, तसा भारतात झाला नाही. ‘देहलीमध्‍ये झालेल्‍या हिंसाचाराच्‍या वेळी पोलिसांनी जात बघून कारवाई केली’, असाही आरोप या लेखात केला आहे. पुढे ‘जॉर्ज फ्‍लॉईड यांच्‍या मृत्‍यूनंतर अमेरिकेत निदर्शनांची ठिणगी पेटली. निदर्शनांची अशी ठिणगी भारतात कधी पेटेल ?’, असा प्रश्‍न विचारून अल्‍पसंख्‍यांकांची माथी भडकवण्‍याचा प्रयत्नही या व्‍हिडीओतून केला आहे.

३. ‘भारतियांमध्‍ये फूट पाडा आणि राज्‍य करा’, हेच बीबीसीचे धोरण !

बीबीसीच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असलेले काही विषय ‘दलित’, ‘दलित-मुसलमान’, ‘जात’, ‘दलितांवरील अत्‍याचार’, ‘गरिबी’, ‘इस्‍लाम’, ‘वंशवाद’, ‘सांप्रदायिक हिंसा’, असे आहेत. याविषयीच्‍या बातम्‍यांचे मथळे, प्रकाशित करत असलेले लेख आणि संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असलेले विषय यांवरून बीबीसी हिंदु धर्म अन् भारताविरुद्ध नियोजनबद्धपणे स्‍वत:चा ‘अजेंडा’ (कार्यसूची) राबवत आहे. या माध्‍यमातून ब्रिटीश अद्यापही ‘भारतियांमध्‍ये फूट पाडा आणि राज्‍य करा’, या धोरणावर अजूनही कायम आहे, असे लक्षात येते. अशा विदेशी वृत्तसंस्‍था, तसेच वृत्तवाहिन्‍या यांवरही भारतियांनी संघटित होऊन चिनी उत्‍पादनांप्रमाणे बहिष्‍कार घालायला हवा, असे प्रकर्षाने वाटते.

– श्री. रवींद्र बनसोड, पाटणतळी, फोंडा, गोवा. (१.२.२०२३)

संपादकीय भूमिका 

भारतियांमध्‍ये फूट पाडू पहाणार्‍या ‘बीबीसी’सारख्‍या विदेशी वृत्तसंस्‍थेवर राष्‍ट्रप्रेमींनी बहिष्‍कार घातल्‍यास आश्‍चर्य ते काय ?