व्‍यासपिठावर साहित्‍यिक पुढे आणि राजकारणी मागे हवेत ! – कवी कुमार विश्‍वास यांचे परखड मत

वर्धा – अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावर साहित्‍यिक पुढे आणि राजकारणी मागे बसावयास हवे होते; कारण जेव्‍हा जेव्‍हा राजकारण डळमळीत झाले, तेव्‍हा तेव्‍हा त्‍याला साहित्‍यिकांनी सावरले आहे, असे परखड मत प्रसिद्ध हिंदी कवी कुमार विश्‍वास यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी येथे प्रमुख अतिथी म्‍हणून बोलतांना व्‍यक्‍त केले.

कवी कुमार विश्‍वास

संमेलनाचा उद़्‍घाटन सोहळा पुष्‍कळ लांबल्‍यामुळे सर्वच वक्‍त्‍यांचा वेळ अल्‍प करण्‍यात आला. यात कुमार विश्‍वास यांना फक्‍त ५ मिनिटे देण्‍यात आली होती. त्‍याविषयी खंत व्‍यक्‍त करतांना ते म्‍हणाले की, साहित्‍यिकांनी नेहमीच राजकारणाला दिशा देण्‍याचे काम केले आहे. राजकारण्‍यांनी चुका केल्‍यास साहित्‍यिकांनी निर्भीडपणे चुका सांगून प्रसंगी मार्गदर्शनही करावे. नामरूपात्‍मक जगतात भाषा ही एक आविष्‍कार आहे; मात्र तिचीच सर्वाधिक उपेक्षा होते.

राज्‍याच्‍या मराठी भाषा मंत्र्यांकडूनच इंग्रजी शब्‍दांचा वापर !

दीपक केसरकर

राज्‍याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना स्‍वतःच्‍या भाषणात अनेक ‘इंग्रजी’ शब्‍द वापरले. ‘प्रमाणपत्राऐवजी ‘सर्टिफिकेट’, अभियांत्रिकीऐवजी ‘इंजिनिअरिंग’, ‘आयकॉनिक’, ‘लायब्ररी’, ‘फॅसिलिटी’चा लाभ’ असे म्‍हणत मराठीचे महत्त्व त्‍यांनी सांगितले.