उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. विवान राजेंद्र दळवी हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. विवान राजेंद्र दळवी हा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. आता वर्ष २०२३ मध्ये साधनेच्या अपुर्या प्रयत्नांमुळे त्याची पातळी तेवढीच राहिली आहे. त्याच्यावर नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष अन् त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल आणि त्याची पातळी पुन्हा वाढेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१४.१.२०२३) |
१. समजूतदारपणाने वागणे
‘गेल्या काही दिवसांपासून कु. विवानमध्ये एखाद्या मोठ्या समजूतदार व्यक्तीप्रमाणे पालट झाले आहेत. एकदा एका साधिकेचा मला भ्रमणभाष आला. त्या वेळी मी व्यस्त असल्याने विवान साधिकेशी बोलला. त्या साधिकेला त्याचे बोलणे एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखे वाटले.
२. मित्रांना समजून घेणे
विवान ‘इतर मुलांना आपला त्रास होणार नाही’, याची काळजी घेऊन खेळतो; पण अन्य मुले मात्र त्याच्याशी कसेही वागतात. विवान त्यांचा त्रास सहन करतो. तो त्याविषयी घरी गार्हाणे करत नाही. तो आम्हाला म्हणतो की, ते माझे मित्र आहेत !
३. व्यवस्थितपणा
विवान सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतो. त्याच्या शाळेतील सर्व शिक्षिका विवानचा व्यवस्थितपणा पाहून त्याचे कौतुक करतात आणि अन्य विद्यार्थ्यांना विवानकडून शिकायला सांगतात.
४. प्रेमाने विचारपूस करून काळजी घेणे
विवानमधील प्रेमभाव वाढत असून त्याच्या बोलण्यात माधुर्य आले आहे. तो माझी किंवा त्याच्या आईची प्रकृती ठीक नसतांना प्रेमाने विचारपूस करतो. एक दिवस माझे डोके पुष्कळ दुखत होते. तेव्हा जवळ येऊन त्याने माझे डोके चेपून दिले आणि ‘आता कसे वाटते ?’, असे प्रेमाने विचारले. त्यानेे विचारल्यामुळे आणि त्याच्या हाताच्या स्पर्शामुळे माझे डोके दुखायचे थांबले.
५. वाईट स्वप्न पडले असतांना विवानच्या तळपायावर हात पडून चैतन्य मिळणे
एकदा मध्यरात्री मला वाईट स्वप्न पडले आणि माझ्या मनात असंख्य विचार येऊ लागले. झोपेतच माझा हात विवानच्या तळपायावर पडला आणि मी त्याच्या पायाला घट्ट पकडले. तेव्हा विवानच्या तळपायातून एक प्रवाह माझ्या मस्तकात गेला आणि माझ्या विचारांचे प्रमाण न्यून होऊ लागले. नंतर मला शांत वाटू लागले. दुसर्या दिवशी विवान मला म्हणाला, ‘‘बाबा, काल रात्री तुमचे हात पुष्कळ उष्ण लागत होते. आता तुम्हाला कसे वाटत आहे ?’’
६. विवानमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने त्याला सूक्ष्म शक्तीचे अस्तित्व जाणवणे
एकदा मुलांशी खेळत असतांना विवानला एका शक्तीचे अस्तित्व जाणवले. त्याने सर्व मुलांना त्याविषयी सांगितले. ते ऐकताच मुले घाबरून त्यांच्या घरी पळून गेली. घरी आल्यावर विवानने आम्हाला याविषयी सांगितले. तेव्हा त्याला भीती वाटू नये; म्हणून मी त्याला म्हणालो, ‘‘तेथे अपुरा प्रकाश असल्याने तुला सावली दिसली असेल !’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आम्ही खेळत असतांना सर्व मुलांच्या सावल्या हलत होत्या; पण एक सावली मात्र स्थिर होती.’’
दुसर्या दिवशी त्या ठिकाणाजवळ रहाणारी एक महिला आमच्याकडे आली आणि म्हणाली, ‘‘ही मुले खेळतात, तिथे एका सूक्ष्म शक्तीचे अस्तित्व आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्हाला हा अनुभव येत आहे. त्या शक्तीचा आम्हाला काही त्रास होत नाही; म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो.’’
७. विवानमधील स्वभावदोष
हट्टीपणा करणे.’
– श्री. राजेंद्र दळवी (कु. विवानचे वडील), डोंबिवली, ठाणे. (२५.५.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
|