शनीशिंगणापूर येथे विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने आंदोलन

दर्शन घेणे आणि तेल वहाणे यांसाठी भाविकांकडून ५०० रुपये घेण्‍याचे प्रकरण

आंदोलनात सहभागी विहिंप आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

नगर – शनीशिंगणापूर येथे चौथर्‍यावर जाऊन तेल वहाण्‍यासाठी आणि चौथर्‍याजवळ दर्शनासाठी भाविकांकडून श्री शनैश्‍वर देवस्‍थान ट्रस्‍ट ५०० रुपये आकारत आहे. सर्वच भाविकांना समान वागणूक आणि विनामूल्‍य दर्शन मिळावे, यासाठी १४ जानेवारी या दिवशी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी शनैश्‍वर मंदिराच्‍या चौथर्‍याजवळ आंदोलन केले. तसेच भाविकांना चौथर्‍यावर जाण्‍यासाठी विनामूल्‍य दर्शन चालू केले. यामुळे भाविकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनात भाविकांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर मंदिर प्रशासनासह झालेल्‍या बैठकीत प्रशासनाने याविषयी लवकरच योग्‍य निर्णय घेण्‍याची सकारात्‍मकता दर्शवली आहे. पुढील मासात योग्‍य तो निर्णय घेतला जाईल, असे देवस्‍थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आश्‍वासन दिल्‍यानंतर आंदोलन मागे घेण्‍यात आले.

‘दरवाजा नसलेल्‍या गावात दर्शनासाठी पैसे भरण्‍याचा दरवाजा आम्‍हाला मान्‍य नाही. फेब्रुवारीत सर्वांना विनामूल्‍य दर्शन न दिल्‍यास तीव्र आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणीही विहिंप आणि बजरंग दल यांनी दिली आहे. ‘शनैश्‍वर देवस्‍थान ट्रस्‍ट हे भाविकांकडून चौथर्‍यावर जाऊन तेल वहाण्‍यासाठी प्रत्‍येकी ५०० रुपये घेत असून यातून भाविकांची आर्थिक लूट विश्‍वस्‍त मंडळाकडून होत आहे. असे केल्‍याने भाविकांच्‍या धार्मिक अधिकारांवर गदा येत आहे’, अशा आशयाचे निवेदनही यापूर्वी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने देवस्‍थानला देण्‍यात आले होते.

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हा अध्‍यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, जिल्‍हामंत्री श्रीकांत नळकांडे, बजरंग दल जिल्‍हा संयोजक अश्‍विनीकुमार बेल्‍हेकर, सहमंत्री विशाल वाघचौरे आणि अन्‍य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आंदोलनात भाग घेतला.

संपादकीय भूमिका

  • भाविकांकडून दर्शनासाठी शुल्‍क आकारणी, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्‍परिणाम !
  • मंदिरांचे पावित्र्य जपण्‍यापेक्षा त्‍यांना व्‍यवसायाचे केंद्र बनवणे कितपत योग्‍य आहे ? ही एकप्रकारे भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे. हा निर्णय भाविकांच्‍या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक यांमध्‍ये भेदभाव निर्माण करणारा आहे. हा निर्णय रहित करण्‍यासाठी आंदोलन करणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे अभिनंदन !