पुणे येथील ‘डहाणूकर कॉलनी’त येशूच्या जन्माच्या नावाखाली आधुनिक वैद्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

  • ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्‍याला विनामूल्य दंतचिकित्सेचे प्रलोभन

  • नागरिकांच्या सतर्कतेमुळे धर्मप्रसार उघडकीस

धर्मांतर (प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे – कोथरूड येथील ‘डहाणूकर कॉलनी’त असलेल्या ‘स्माईल डेंटल क्लिनिक’ समोरील मोकळ्या जागेत मंडप, आसंद्या मांडून २५ डिसेंबरपासून डॉ. अनिता पाटील यांनी कोणतीही रीतसर अनुमती न घेता येशूच्या जन्माच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मप्रसार चालू केला होता. ‘जो कोणी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करील, त्याला आम्ही विनामूल्य दंतचिकित्सा देऊ’, असे आमीष दाखवून त्यांनी ‘डहाणूकर कॉलनी’त धर्मप्रसाराची पत्रके वाटली. या सर्व प्रकाराला तेथील जागरूक नागरिकांनी विरोध केला. त्यानंतरही डॉ. पाटील यांनी अल्पवयीन मुलांना, आर्थिक निम्न स्तरातील नागरिकांना गोळा करून हिंदु धर्माविरुद्ध चुकीची माहिती सांगत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार डहाणूकरमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आणि त्या विरोधात डहाणूकर येथील सर्व नागरीक एकत्र आले अन् त्यांनी हा प्रकार बंद पाडला. या प्रकरणी भाजप कार्यकर्ते बाळू दांडेकर यांनीही येथील नागरिकांना सहकार्य केले.

संकुलातील रहिवाशांनी सांगितले की,

१. आज डहाणूकर कॉलनीमध्ये घडलेल्या प्रकारामध्ये आधुनिक वैद्य ज्या स्वतःला ‘सिस्टर’ म्हणवून घेत होत्या, त्या विविध प्रकारची प्रलोभनेच दाखवत होत्या.

२. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे प्रलोभन वेगळे होते. लहान मुलांना भेटवस्तू आणि मोठ्यांना विनामूल्य किंवा अत्यंत क्षुल्लक दरात वैद्यकीय सल्ला अन् त्यासह येशूची प्रार्थना आणि संदेश असलेले एक पुस्तक.

३. काही भेटवस्तू चमकदार कागदांमध्ये गुंडाळल्या होती. त्यामध्ये काही पुस्तके आणि प्रार्थनेला येण्याविषयी संदेश आणि संपर्क क्रमांक होता. सुशिक्षित डॉक्टर्सही यांच्या जाळ्यात ओढले जाऊन त्यांचा धर्मप्रसार करायला लागले आहेत. पाटील या भोसरी येथील रहिवासी असून त्यांनी लक्ष्मीनगर येथील ३-४ घरांतील लोकांचे धर्मांतर केले आहे. ४. हिंदु धर्माविषयी चुकीची माहिती असणारी पुस्तके त्यांनी मुलांना, महिलांना दिली असल्याची माहिती आहे.

संपादकीय भूमिका

  • यातून ख्रिस्ती धर्मांतराचे प्रकार करण्यासाठी कोणत्या थराला जातात, हे लक्षात येते. ख्रिस्त्यांच्या धर्मांतराला पायबंद घालण्यासाठी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आणला पाहिजे !