जळगावातील शिवतीर्थ मैदानावर आज होणार हिंदुत्वाची सिंहगर्जना !

शिवतीर्थ मैदानावर सभेचे व्यासपीठ सिद्ध करतांना धर्मप्रेमी
सभास्थळाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले भगवे कापड

जळगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) – येथे २५ डिसेंबर या दिवशी शीवतीर्थ मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून २५ डिसेंबरला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार विविध माध्यमांतून जोमाने चालू असून या सभेची जळगाववासियांची प्रतीक्षा आता संपणार आहे. २४ डिसेंबर या दिवशी दिवसभर सभेचे मैदान सज्ज होण्यास प्रारंभ झाला आहे. सभास्थळाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने भगवे कापड लावले असल्याने सभास्थळाकडे जाणारा संपूर्ण मार्ग भगवामय झाला आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये होणार्‍या वक्त्यांच्या जाज्वल्य भाषणांमुळे शिवतीर्थ मैदानावर हिंदुत्वाची सिंहगर्जना पुन्हा एकदा जळगाववासियांना ऐकायला मिळणार आहे !